कायद्यासंबधी जागृती करण्याबरोबरच विविध सरकारी योजनांची माहिती देणार – जिल्हा न्यायाधिश एम.बी.लंबे

आझादी का अमृतमहोत्सव निमित्त कायदेविषयक जागृती आणि रॅलीचे आयोजन
 पंढरपूर /नागेश आदापुरे,दि.02/10/2021:- आझादी का अमृतमहोत्सव या निमित्त दि. 2 ते 8 ऑक्टोबर या कालावधीत विधी सेवा प्राधिकरण च्या माध्यमातून कायदेविषयक जागृतीसाठी तालुका वकील बार असोसिएशन व पंचायत समिती पंढरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधिश एम.बी.लंबे यांनी दिली.

   आझादी का अमृतमहोत्सवा निमित्त शहरा सह तालुक्यात विविध ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमातंर्गत कायद्याविषयक जागृतीबरोबरच शासकीय योजनांची माहिती देण्यात येणार असून पॅन इंडीया जनजागृती कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर दिनांक 2 ऑक्टोबर 2021 रोजी विठ्ठल मंदीर परिसर ते शिवाजी चौक येथे सकाळी 8.30 वाजता रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.दि.03 ऑक्टोबर रोजी ग्रामपंचायत शेगांव दुमाला येथे सकाळी 10.00 वाजता , दि. 04 ऑक्टोबर रोजी जिल्हा न्यायालय पंढरपूर येथे दुपारी 2.00 वाजता, दि. 05 ऑक्टोबर रोजी ग्रामपंचायत वाखरी दुपारी 2.00 वाजता,दि.06ऑक्टोबर रोजी ग्रामपंचायत, चिचुंबे येथे दुपारी 2.00 वाजता,दि.07 ऑक्टोबर रोजी तहसिल कार्यालय, पंढरपूर येथे दुपारी 2.00 वाजता तर दि.08 ऑक्टोबर रोजी पंचायत समिती कार्यालय, पंढरपूर येथे दुपारी 2.00 वाजता कायर्क्रमाचे आयोजन केले असल्याचे जिल्हा न्यायाधिश एम.बी.लंबे यांनी सांगितले.

   या कार्यक्रमातंर्गत कायद्यासंबधी जागृती करण्याबरोबरच विविध सरकारी योजनांची माहिती देण्यात येणार असल्याने जास्ती-जास्त नागरिकांना या शिबीराचा लाभ घ्यावा असे आवाहनही जिल्हा न्यायाधिश एम.बी.लंबे यांनी केले आहे.

आजादी का अमृत महोत्सव’ या कार्यक्रमांतर्गत दि 02 ऑक्टोबर रोजी गांधी जयंती निमित्त श्री. विठ्ठल-रुक्मिणी मंदीर येथील नामदेव पायरी पासून छत्रपती शिवाजी चौकापर्यंत रॅली काढण्यात आली.

   आजादी का अमृत महोत्सव कार्यक्रमांतर्गत जिल्हा न्यायाधिश एम.बी.लंबे यांच्या मार्गदर्शना खाली व सह-दिवाणी न्यायाधीश ए.पी.कराड यांच्या अध्यक्षतेखाली रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीमध्ये श्री विठ्ठल-रुक्मिणी वेद पाठशाळा, पंढरपूर येथील विद्यार्थ्यांनी महात्मा गांधी जयंती निमित्त गांधीजींचा पोशाख परिधान करून उत्स्फूर्त सहभाग घेतला. ही रॅली शिवाजी चौकामध्ये आल्यानंतर महात्मा गांधी व लालबहाद्दूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.यावेळी कायदे विषयक शिबीराचेही आयोजन करण्यात आले होते.

  कार्यक्रमास न्यायाधीश श्रीमती ए.एस.नलगे, श्रीमती एस.एस.खरोशे, सहायक गटविकास अधिकारी श्री.पिसे,पंढरपूर बार असोसिएशन अध्यक्ष अँड.भगवान मुळे तसेच विधिज्ञ,विधी स्वयंसेवक,अधिकारी, कर्मचारी व नागरिक उपस्थित होते. या कार्यक्रमास राजीव कटेकर, विधी स्वयंसेवक यांचे विशेष योगदान लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: