महात्मा गांधीजींनी सामान्य माणसाला ब्रिटिशांच्या विरोधात लढण्यासाठी प्रवृत्त केले हाच मोठा विजय – प्राचार्य डॉ.गणेश राऊत
स्वेरीत राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी
पंढरपूर- ‘महात्मा गांधीजींच्या आणि लालबहादूर शास्त्री यांच्या जीवनात जर डोकावून पाहिले तर आपणांस हे लक्षात येते की, त्यांनी कायम इतरांच्या व स्वतःच्या अनुभवातून संपूर्ण विश्वाला आदर्श शिकवण दिली. महात्मा गांधीजींच्या प्रत्येक कार्यात कस्तुरबा ह्या अग्रेसर असायच्या. त्याचे कारण असे की, महात्मा गांधींनी मोठ्या प्रमाणात स्त्रियांना घराचा उंबरठा ओलांडून भारतात हरवल्या गेलेल्या स्त्री शक्तीची जाणीव ब्रिटिशांबरोबरच संपूर्ण जगाला करून दिली. स्त्री शक्तीला जागृत करण्याचे महान कार्य महात्मा गांधी यांनी केले तसेच लालबहादूर शास्त्री यांनी ‘जय जवान जय किसान’ ही घोषणा करून वेळप्रसंगी त्याग व सीमेवरील जवानांच्या मागे खंबीरपणे उभे कसे राहायचे? हा आदर्श शास्त्रीजींनी घालून दिला. म्हणून गांधीजी आणि शास्त्रीजी या भारताच्या दोन सुपुत्रांची साऱ्या विश्वात ओळख निर्माण झाली. म. गांधीजींनी सामान्यातला सामान्य माणसाला ब्रिटिशांच्या विरोधात लढण्यासाठी प्रवृत्त केले हाच मोठा विजय होय.’ असे प्रतिपादन पुण्यातील हरिभाऊ व्ही.देसाई महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.गणेश राऊत यांनी केले.
गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री. विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयूट, पंढरपूर संचलित अभियांत्रिकी महाविद्यालयातर्फे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची १५२ वी तर भारताचे दुसरे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची ११७ वी जयंती साजरी करण्यात आली. यावेळी आयोजिलेल्या ऑनलाइन कार्यक्रमात प्राचार्य डॉ.गणेश राऊत हे ‘महात्मा गांधीजींचे विचार व वारसा’ या विषयावर विद्यार्थी व प्राध्यापकांना मार्गदर्शन करत होते.
प्रास्तविक स्वेरीचे संस्थापक सचिव अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांनी केले . प्रारंभी स्वेरी इंजिनिअरिंगमध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि भारताचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
यावेळी म.गांधीजींच्या जीवनावर अधिक प्रकाश टाकताना संग्रहित पोस्ट तिकिटे, महत्वपूर्ण प्रसंगांचे फोटो आदी बाबींचे दर्शन घडवण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष नामदेव कागदे, विश्वस्त एच.एम. बागल, विश्वस्त बी.डी. रोंगे, स्वेरी कॅम्पसचे इन्चार्ज, बी. फार्मसीचे प्रभारी प्राचार्य डॉ.मिथुन मणियार, डिप्लोमा इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ.एन.डी. मिसाळ, डी. फार्मसीचे प्राचार्य प्रा.सतिश मांडवे,सर्व अधिष्ठाता,सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. यशपाल खेडकर यांनी केले.
ज्येष्ठ संस्थापक विश्वस्त दादासाहेब रोंगे यांनी आपल्या समारोपाच्या भाषणातुन स्वेरीमध्ये रुजलेल्या ‘कमवा व शिका’ योजनेची माहिती देऊन महात्मा गांधीजींच्या विचारांच्या व सामाजिक कार्याच्या जाणिवेतून स्वेरीचे शैक्षणिक कामकाज चालू असल्याचेही त्यांनी स्पष्ट करून उपस्थितांचे आभार मानले.