कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या; सलग चौथ्या दिवशी पेट्रोल-डिझेलचा उडाला भडका
या आठवड्यात पेट्रोल ११५ पैशांनी महाग झाले आहे. देशातील अनेक राज्यांमध्ये पेट्रोलच्या किंमतीने शंभरीचा आकडा ओलांडला आहे. या राज्यांमध्ये बिहार, मध्य प्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, ओडिशा, जम्मू आणि काश्मीर आणि लडाख यांचा समावेश आहे. या सर्व राज्यांमध्ये पेट्रोलची किंमत १०० रुपये प्रति लीटरच्या पुढे गेली आहे.
आजचे पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर –
– दिल्लीत पेट्रोलची किंमत १०२.३९ रुपये आहे, तर डिझेलची किंमत ९०.७७ रुपये प्रती लीटर आहे.
– मुंबईत पेट्रोलची किंमत १०८.४३ रुपये आणि डिझेलची किंमत ९८.४३ रुपये प्रती लीटर आहे.
– कोलकातामध्ये पेट्रोलची किंमत १०३.०७ रुपये आहे, तर डिझेलची किंमत ९३.८७ रुपये प्रती लीटर आहे.
– चेन्नईमध्ये पेट्रोल १००.०१ रुपये लिटर, तर डिझेल ९५.३१ रुपये प्रती लीटर आहे.
कच्चे तेल आता का महाग होत आहे?
रॉयटर्स या वृत्तसंस्थेच्या मते, ओपेक + ची बैठक ४ ऑक्टोबर रोजी म्हणजेच सोमवारी आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीपूर्वी अनेक अंदाज बांधले जात आहेत. बैठकीत कच्च्या तेलाचे उत्पादन कमी करण्याची तयारी केली जात असल्याचे मानले जात आहे, पण अद्याप यावर कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. अशा बातम्यांमुळे कच्च्या तेलाचे भाव पुन्हा वाढू लागले आहेत. हा वेग आगामी काळातही कायम राहू शकतो.
भारतात डिझेल आणि पेट्रोलचे दर ठरवण्याचे काम तेल कंपन्या करतात. या किंमती ठरवण्यात परदेशी बाजारातील कच्च्या तेलाच्या (क्रूड ऑईल) किंमती मोठी भूमिका निभावतात. तेल कंपन्या १५ दिवसांच्या कच्च्या तेलाची सरासरी किंमत आणि डॉलर मूल्याच्या आधारावर पेट्रोल आणि डिझेलचे दर निश्चित करतात.