आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर पंजाबच्या संघाला बसला अजून एक धक्का, पाहा नेमकं घडलं तरी काय…
आरसीबीचा संघ हा पंजाबविरुद्धच्या सामन्यापूर्वी १४ गुणांसह तिसऱ्या स्थानावर होता, आजच्या सामन्यानंतरही आरसीबीमध्ये कोणताही फरक पडलेला पाहायला मिळाला नाही, कारण आरसीबीचा संघ अजूही तिसऱ्याच स्थानावर आहे. आजच्या सामन्यातील विजयासह आरसीबीचे १६ गुण झाले आहेत आणि त्यांनी प्ले-ऑफमध्ये स्थान निश्चित केले आहे. त्यामुळे आता आरसीबीच्या संघाला साखळी सामन्यांमध्ये जास्त काळजी करायची गरज नाही. त्यामुळे चेन्नई, दिल्लीपाठोपाठ आरसीबीचा तिसरा संघ हा प्ले-ऑफसाठी निश्चित झाला आहे.
आरसीबीच्या संघाने आज नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि ग्लेन मॅक्सवेलने तो योग्य असल्याचे दाखवून दिले. कारण मॅक्सवेलने आजच्या सामन्यातही धडाकेबाज फलंदाजी करत अर्धशतक झळकावले. आरसीबीच्या संघाला देवदत्त पडीक्कलने चांगली सुरुवात करून दिली, पण ४० धावांवर तो बाद झाला. त्यावेळी आरसीबीच्या संघाची संपूर्ण जबाबदारी मॅक्सवेलने आपल्या खांद्यावर घेतल्याचे पाहायला मिळाले. मॅक्सवेलने यावेळी ३३ चेंडूंत ३ चौकार आणि चार षटकारांच्या जोरावर ५७ धावा फटकावल्या, त्यामुळेच आरसीबीच्या संघाला पंजाबपुढे १६५ धावांचे आव्हान ठेवता आले.