एकनाथ खडसेंकडून नाव न घेता फडणवीसांवर खरमरीत टीका; म्हणाले…
हायलाइट्स:
- एकनाथ खडसेंची भाजप नेत्यांवर खरमरीत टीका
- गिरीश महाजनांसह फडणवीसांवर हल्लाबोल
- ई़डी चौकशीवरून केले गंभीर आरोप
गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे व भाजप नेते गिरीश महाजन यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. गिरीश महाजन यांनी शनिवारी खडसे यांच्यावर टीका केल्यानंतर आज जिल्ह्यातील एका कार्यक्रमात खडसे यांनी महाजन यांच्यासह देवेंद्र फडणवीस यांच्यावरही हल्लाबोल केला आहे.
यावेळी खडसे यांनी सांगितलं की, ‘राष्ट्रवादीत आल्यावर भाजपातील कोण गद्दार आहे ते मला कळाले. इथल्या आमदारांना मी सांगतो तुम्ही कुणाच्या बळावर निवडून आले. पण, कुणाचे तरी ऐकायचे आणि नाथाभाऊच्या मागे ईडी लावायची. कधी अॅन्टी करप्शन लावायचे, कधी इन्कम टॅक्स लावायचे. नाथाभाऊच्या घरावर दोन वेळा इन्कम टॅक्सची चौकशी झाली. अॅन्टी करप्शनची चौकशी झाली, त्यांनी कुठलाही गैरव्यवहार झाला नसल्याचं सांगितलं. न्यायालयात देखील त्यांनी तसा क्लोजर रिपोर्ट दिला,’ असंही खडसे यांनी म्हटलं आहे.
गिरीश महाजनांवर हल्लाबोल
‘माझ्याकडे नाथाभाऊंचे शंभर उतारे असल्याचं काल गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे. मी त्यांना आव्हान देतो की, माझ्या खानदानी प्रॉपर्टीवर मी जे कमावले असेल, जे इन्कम टॅक्सला दाखवलं असेल त्याच्यापेक्षा एक रुपयापेक्षा जास्त पॉपर्टी असेल तर मी तुम्हाला दान करून टाकतो. ज्या नाथाभाऊच्या जीवावर जिल्हा परिषद, जिल्हा बँक व दूध फेडरेशन ताब्यात आले. विकास कामे मार्गी लागली, त्या नाथाभाऊंना तिकीट दिलं नाही. मला वाटलं नव्हतं की इतके कृतघ्न होतील, नीच पातळीवर जातील,’ अशा शब्दांत एकनाथ खडसे यांनी भाजप नेत्यांवर टीकास्त्र सोडलं आहे.
दरम्यान, एकनाथ खडसे यांच्या या टीकेला भाजप नेत्यांकडून कसं उत्तर दिलं जातं, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.