Mumbai Rave Party: आर्यन खान ड्रग्ज तस्करांच्या संपर्कात?; वानखेडे यांनी दिली ‘ही’ महत्त्वाची माहिती
हायलाइट्स:
- क्रूझवरील ड्रग्ज पार्टीप्रकरणी एनसीबीच्या तपासाला वेग.
- आरोपी आणि ड्रग्ज तस्कर यांच्यातील धागेदोरे शोधणार.
- समीर वानखेडे यांनी तपासाबाबत दिली महत्त्वाची माहिती.
वाचा: ड्रग्ज पार्टी प्रकरणी मोठी कारवाई; शाहरुखच्या मुलासह तीन जणांना अटक
समीर वानखेडे यांनी क्रूझवरील हायप्रोफाइल ड्रग्ज पार्टी प्रकरणी तपासाची पुढची दिशा स्पष्ट केली. ‘ज्या आरोपींना अटक करण्यात आली आहे त्यांच्याकडून काही महत्त्वाचे पुरावे हाती लागले आहेत. त्याआधारे हे आरोपी आणि ड्रग्ज तस्कर यांच्यात काही लिंक आहे का, याचा तपास करण्यात येणार आहे’, असे वानखेडे यांनी सांगितले. तरुणांच्या या ग्रुपला ड्रग्जचा पुरवठा करणाऱ्यांचा माग आम्ही घेत आहोत. त्यात एक ड्रग्ज तस्कर आमच्या जाळ्यात आला आहे. आमच्या दुसऱ्या टीमने ही कारवाई केलीय. संबंधित व्यक्तीने या सर्वांच्या सोबतच पार्टीसाठी बुकिंग केले होते. आरोपींकडे याबाबत आम्ही चौकशी करणार आहोत. तो आरोपींच्या संपर्कात होता का, याचाही तपास केला जाणार आहे. या प्रकरणातील ही पुढची कारवाई असून संबंधित व्यक्तीकडे ड्रग्जचा साठा सापडला आहे’, अशी महत्त्वाची माहितीही वानखेडे यांनी दिली.
वाचा: आर्यनकडे ड्रग्जचा साठा व मोठी रोकड; अॅरेस्ट रिपोर्टमध्ये काय म्हटलंय?
राजकीय नेता या पार्टीत सहभागी होता, अशी चर्चा होती. त्याबाबत माध्यमांनी विचारणा केली असता, हे केवळ कयास लावले जात असून असे प्रश्न कृपा करून विचारू नका, असे वानखेडे म्हणाले. या संपूर्ण प्रकरणाचा सध्या तपास सुरू आहे. अशावेळी त्याबाबत सर्वकाही मी तुमच्यासमोर आताच उघड करू शकत नाही, असेही वानखेडे यांनी स्पष्ट केले व अधिक बोलणे टाळले.
दरम्यान, बॉलिवूड-ड्रग्ज माफिया यांच्यातील कनेक्शनचा पर्दाफाश करणाऱ्या अनेक कारवायांमुळे समीर वानखेडे हे गेल्या काही काळापासून चर्चेत आहेत. कर्तव्यकठोर अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे. आता शाहरुख खानच्या मुलावरील कारवाईने वानखेडे यांचे नाव पुन्हा चर्चेत आले आहे. एनसीबीच्या मुंबई युनिटची ही खूप मोठी कारवाई ठरली आहे.
वाचा: ड्रग्ज पार्टी: आणखी पाच जणांना अटक; आर्यनची जामिनासाठी धडपड