वडिलांच्या हत्येप्रकरणी मुलगा अटकेत, पोलीस कोठडीत रवानगी
हायलाइट्स:
- वडिलांची हत्या करणारा आरोपी अटकेत
- न्यायालयाकडून आरोपीला पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश
- गुन्ह्याचा हेतू अद्याप अस्पष्ट
मृत भिकन रत्नाकर शेळके (६०) हे पत्नी आणि मुलासह दलालवाडी भागात राहात होते आणि मोलमजुरी करत होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांनी काम थांबवलं होतं. एक ऑक्टोबर रोजी भिकन हे विष्णुनगर येथे राहणाऱ्या मुलीच्या घरुन आरोपी विकास भिकनराव शेळके (३३) याच्या घरी आले होते. त्याच रात्री दहा वाजेच्या सुमारास आरोपी विकास व भिकन हे घरात एकटेच होते. विकासने भिकन यांना घरी येऊ नये, यासाठी मारहाण करायला सुरुवात केली.
दरम्यान, सामाजिक कार्यकर्ते अजय चावरिया, पप्पू इंगळे, शुभम थोरात, रोहित लहाने, रणजित ठाकूर, सौरभ जाधव, ऋषिकेश ऊर्फ करण कुंठे यांना मारहाण झाल्याचा आवाज आला. त्यामुळे त्यांनी शेळके यांच्या घराजवळ धाव घेऊन पाहणी केली तेव्हा विकास हा भिकन यांना बेदम मारहाण करत असल्याचे दिसून आले. विकास हा भिकन यांच्या डोक्यात दगड घालणार तेवढ्यात ऋषिकेश ऊर्फ करण कुंठे व इतर लोकांनी विकासला पकडले.
यावेळी रक्तबंबाळ झालेल्या भिकन यांना तात्काळ घाटीत दाखल केले. उपचार सुरू असताना डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. या प्रकरणात ऋषिकेश ऊर्फ करण कुंठे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन क्रांतीचौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीला रविवारी अटक करुन न्यायालयात हजर करण्यात आले.
गुन्ह्याचा हेतू अस्पष्ट
वडिलांची हत्या करण्यामागे आरोपीचा नेमका हेतू काय होता, आरोपीने कोणाच्या सांगण्यावरुन गुन्हा केला, गुन्ह्यात आरोपीला कोणी मदत केली का, आदी बाबींचा तपास बाकी असल्याने आरोपीला पोलीस कोठडी देण्याची विनंती सरकारी वकिलांनी न्यायालयात केली. ही विनंती मान्य करुन न्यायालयाने आरोपीला गुरुवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.