Aryan Khan ड्रग्ज पार्टी: आर्यन खानसह तिघांना एनसीबी कोठडी; ‘ते’ व्हॉट्सअॅप चॅट हाती
हायलाइट्स:
- शाहरुख खानचा मुलगा आर्यनला उद्यापर्यंत एनसीबी कोठडी.
- आर्यनसह अन्य दोन जणांनाही कोर्टाने सुनावली कोठडी.
- क्रूझवरील रेव्ह पार्टी प्रकरणी तिघांनाही झाली आहे अटक.
वाचा: शाहरुखच्या मुलासह ८ जणांना ताब्यात का घेतलं?; NCB प्रमुख म्हणाले…
किला कोर्टात एनसीबीने आर्यन, अरबाज आणि मूनमून या तिघांची अधिक चौकशी करायची असल्याने ५ ऑक्टोबरपर्यंत कोठडीची मागणी केली. आरोपी हे ड्रग्ज पुरवठादारांशी व्हॉट्सअॅप चॅटच्या माध्यमातून सतत संपर्कात असल्याचे आढळून आले आहे. मोबाइल फोनमधून त्याचे पुरावे मिळाले आहेत, असेही एनसीबीच्या वकिलांनी कोर्टाला सांगितले. त्यानंतर अॅड. सतीष मानेशिंदे यांनी आर्यनची बाजू मांडली. दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर कोर्टाने आर्यन व अन्य दोघांना उद्यापर्यंत (४ ऑक्टोबर ) एनसीबी कोठडी सुनावली.
वाचा: ड्रग्ज पार्टी प्रकरणी मोठी कारवाई; शाहरुखच्या मुलासह तीन जणांना अटक
दरम्यान, आर्यनच्या वतीने आजच जामिनासाठी अर्ज करण्यात आला असून त्यावर आता उद्या सुनावणी होणार आहे.
नेमकं काय आहे प्रकरण?
मुंबई येथून गोवा येथे जात असलेल्या कॉर्डेलिया या आलिशान क्रूझवर एका पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या पार्टीसाठी आयोजकांनी ८० हजार ते दोन लाखांपर्यंत शुल्क आकारले होते. या हायप्रोफाइल पार्टीत ड्रग्जचा पुरवठा करण्यात आल्याची पक्की खबर एनसीबीला मिळाली होती. त्यामुळे एनसीबीची टीम आधीपासूनच या पार्टीच्या मागावर होती. एनसीबीने आधीच सापळा रचला होता. एनसीबीने पार्टीच्या तिकीट खरेदी केल्या होत्या. त्यानंतर २२ जणांचे पथक प्रवासी बनून या क्रूझवरील पार्टीत पोहचले. शनिवारी रात्री क्रूझवर पार्टी रंगात आली असतानाच या पथकाने कारवाई करत ही पार्टी उधळली. या कारवाईत कोकेन, एमडी, चरस, गांजा असे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. त्याआधारेच शाहरुखचा मुलगा आर्यनसह ८ जणांना ताब्यात घेण्यात आले होते.
वाचा:मुंबई-गोवा क्रुझवरील पार्टीमध्ये प्रवेशासाठी होता हा ‘कोडवर्ड’, NCB चा मोठा खुलासा