Covid19: चार तासांचा प्रवास केवळ १५ मिनिटांत, पहिल्यांदाच करोना लसीची ड्रोननं वाहतूक!
हायलाइट्स:
- भारतात पहिल्यांदाच लस पोहचवण्यासाठी ड्रोनचा वापर
- भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचा प्रयोग यशस्वी
- केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी दिली माहिती
या निमित्तानं भारतातील दक्षिण – पूर्व आशिया भागात पहिल्यांदाच ड्रोनचा व्यावसायिक वापर करण्यात आला. मणिूपरच्या विष्णूपूर ते करांग असा २६ किलोमीटरचा साधारणत: तीन ते चार तासांचा रस्ते प्रवास टाळून करोना लस पोहचवण्यात आल्या. यासाठी ड्रोनचा वापर करण्यात आल्यानं हा प्रवास केवळ १५ किलोमीटरचा ठरला आणि हा प्रवास करण्यासाठी ड्रोनला केवळ १२ ते १५ मिनिटांचा वेळ लागला. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेकडून करण्यात आलेला हा प्रयोग यशस्वी ठरलाय.
मणिपूरच्या लोक टक तलाव ओलांडत करांग बेटावर ड्रोनच्या साहाय्यानं करोना लस पोहचवण्यात आल्या. संपूर्ण भारतीय बनावटीच्या या ड्रोननं ऑटोमॅटिक अर्थात स्वयंचलित पद्धतीनं आपलं काम फत्ते केलं.
केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी या निमित्तानं आपला आनंद व्यक्त केला आहे. ‘आज दक्षिण पूर्ण आशियात पहिल्यांदाच ड्रोननं व्यावसायिकरित्या उड्डाण घेतलं. यासाठी आयसीएमआर, मणिपूर सरकार, तांत्रिक कर्मचारी या सर्वांचं अभिनंदन’, असं मांडविया यांनी म्हटलंय.
करोउल्लेखनीय म्हणजे, मणिपूरच्या करांग भागाची लोकसंख्या जवळपास ३५०० आहे. यापैंकी ३० टक्के नागरिकांना करोना लसीचे दोन्ही डोस देण्यात आले आहेत. येणाऱ्या काही दिवसांत मणिपूरच्या आणखी दोन जिल्ह्यांत अशाच पद्धतीनं ड्रोनच्या सहाय्यानं करोना लस पोहचवण्याची योजना आहे.
आज करोना लस पोहचवण्यात आलीय. भविष्यात गरज भासल्यास एखाद्या ठिकाणी लाईफ सेव्हिंग ड्रग्जही पोहचविले जाऊ शकतात. तसंच शेतात कीटकनाशक आणि युरियाची फवारणीदेखील ड्रोनद्वारे केली जाऊ शकते, असंही मांडविया यांनी यावेळी म्हटलंय.