मंदीर समितीने कोरोना नियमांचे पालन करुन दर्शनाबाबत योग्य नियोजन करावे -प्रांताधिकारी गजानन गुरव

विठ्ठल-रुक्मिणी मंदीर समितीने योग्य नियोजन करुन राज्य शासनाने दिलेल्या सर्व सूचनांचे काटेकोर पालन करावे

पंढरपूर / नागेश आदापुरे, दि. ४ :- राज्यातील धार्मिक स्थळे ०७ ऑक्टोबरपासून भाविकांसाठी खुली करण्याची परवानगी राज्य शासनाने दिली आहे. पंढरपूरात विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी राज्यातील तसेच परराज्यातील भाविक मोठ्या प्रमाणात येतात. दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची गर्दी होण्याची शक्यता आहे. यासाठी विठ्ठल-रुक्मिणी मंदीर समितीने योग्य नियोजन करुन राज्य शासनाने दिलेल्या सर्व सूचनांचे काटेकोर पालन करावे. तसेच पंढरपूरात येणाऱ्या भाविकांची रेल्वेस्टेशन, बसस्थानक, वाहनतळ याठिकाणी संबंधित विभागाने आरोग्य तपासणी करावी, अशा सूचना प्रांताधिकारी गजानन गुरव यांनी दिल्या.

श्री. विठ्ठल-रुक्मिणी मंदीर भाविकांसाठी सुरु करण्याच्या नियोजनाबाबत नवीन भक्त निवास पंढरपूर येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम, गटविकास अधिकारी पी.डी.काळे, मुख्याधिकारी अरविंद माळी, पोलीस निरिक्षक अरुण पवार,मंदीर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड, नायब तहसिलदार मनोज श्रोत्री, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.एकनाथ बोधले, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.अरविंद गिराम, आगार व्यवस्थापक सुधीर सुतार, अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी व्ही.एस.भुसे आदी उपस्थित होते.

यावेळी प्रांताधिकारी गुरव म्हणाले, कोरोनाच्या संभाव्य तिसरी लाटेची शक्यता लक्षात घेता कोरोना नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. यासाठी मंदीर समितीने ऑनलाईन, ऑफलाईन दर्शनाबाबत योग्य नियोजन करावे. समितीने दर्शनासाठी येणाऱ्या वारकरी व भाविकांची आरोग्य तपासणी करावी. मंदीरात नेमण्यात आलेल्या अधिकारी व कर्मचारी यांचीही आरोग्य तपासणी करावी. दर्शन रांग , दर्शन मंडप व मंदीराची वेळोवेळी स्वच्छता करण्यात यावी, दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांमध्ये सामाजिक अंतर राहिल याची दक्षता घ्यावी. तसेच मंदीर परिसरात वैद्यकीय पथकाची नेमणूक करुन सुसज्ज रुग्णवाहिका सज्ज ठेवावी . दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी कोणते नियम पाळावेत याबाबत नियमावली फलक लावावेत. तसेच ध्वनीक्षेपकाव्दारे वेळोवेळी सूचना द्याव्यात,असेही त्यांनी यावेळी सांगितले.

नगरपालिकेने स्वच्छ पिण्याचे पाणी पुरवठा करण्याबरोबरच दर्शनी भागावर कोरोनाबाबत जनजागृतीपर फलक लावावेत. मंदीर परिसरातील विक्रेते यांची वेळोवेळी कोरोना चाचणी करुन घ्यावी. दुकानात एकाच ठिकाणी गर्दी होणार नाही यासाठी सामाजिक अंतराचे वर्तुळे काढण्याबाबत दुकानदारांना सूचना द्याव्यात. अन्न व औषध प्रशासन विभागाने-पंढरपूर शहरातील सर्व हॉटेल, ढाबे, उपहारगृह येथील खाद्यपदार्थांची तपासणी करावी. लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाने चंद्रभागा नदी पात्रात सोडण्यात येणाऱ्या पाण्याचे योग्य नियोजन करावे.

पोलीस प्रशासनाने भाविकांच्या व नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात. दर्शनासाठी शहरात मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होण्याची शक्यता असल्याने वाहतुकीस अडथळा होणार नाही याची तसेच आरोग्य विभागाने मुबलक प्रमाणात औषधसाठा उपलब्ध राहिल याची दक्षता घ्यावी, असे निर्देशही प्रांताधिकारी गुरव यांनी दिले.

भाविकांनी प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करावे असे आवाहनही गुरव यांनी यावेळी केले.

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: