‘यूपीत इतकं मोठं मृत्युकांड होऊनही देशातला मीडिया शाहरुखच्या मुलाच्या बातम्यांचा पाठलाग करतोय’
हायलाइट्स:
- शिवसेनेच्या मुखपत्रातून देशातील मीडियाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
- उत्तर प्रदेशातील शेतकरी हत्याकांडाकडं दुर्लक्ष केल्याचा आरोप
- मग ‘जय जवान, जय किसान’चे नारे कशासाठी द्यायचे? – शिवसेना
शिवसेनेनं ‘सामना’च्या अग्रलेखातून मीडियाच्या या भूमिकेबद्दल चिंता व्यक्त केली आहे. ‘भारत ज्या चार स्तंभांवर टिकून आहे, ते स्तंभ भय आणि दहशतीच्या वाळवीने पोखरले गेले आहेत. इतकं मोठं मृत्युकांड होऊनही देशातला मीडिया शाहरुख खानच्या मुलानं १३ ग्रॅम ड्रग्ज घेतल्याच्या बातम्यांचा पाठलाग करीत आहे. उत्तर प्रदेशात मंत्रीपुत्रानं चार शेतकरी चिरडून मारले, यापेक्षा शाहरुख खानच्या पोराचे प्रताप या मंडळींना महत्त्वाचे वाटतात. शाहरुख खानचा मुलगा व त्याच्या नशेबाज मित्रमंडळींचं कृत्य हा श्रीमंतांचा माज आहे. त्यांच्यावर कायद्यानं कठोरात कठोर कारवाई होईलच, पण शाहरुख पुत्राच्या कृत्याचे ढोल बडविताना मीडियानं उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांच्या निर्घृण हत्यांवर जणू पडदाच टाकण्याचा प्रयत्न केला आहे,’ असा थेट आरोप शिवसेनेनं केला आहे.
वाचा: बड्या दलालांना अटक होऊनही मुंबईत कुठून व कसे येतेय ड्रग्ज?
‘केंद्रीय मंत्र्यांच्या मुलाने केलेला हा अपराध दुसऱ्या एखाद्या राज्यात घडला असता तर भाजपनं देश डोक्यावर घेतला असता. आता शेतकऱ्यांनाच गुन्हेगार, अराजकवादी ठरविण्यासाठी आटापिटा सुरू आहे. शेतकऱ्यांच्या हत्या, शेतकऱ्यांचं रक्त यापेक्षा श्रीमंतांच्या पोरांची अमली पदार्थांची व्यसनं आणि थेरं कुणाला महत्त्वाची वाटत असतील तर ‘जय जवान, जय किसान’चे नारे कशासाठी द्यायचे? बंद करा ती थेरं,’ असा संताप अग्रलेखातून व्यक्त करण्यात आला आहे.
पंतप्रधानांचं आश्चर्य वाटतं!
‘आपले प्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कमालीचं संवेदनशील तसंच भावनाशील व्यक्तिमत्त्व आहे. त्यांना मानवता आणि गरीबांच्या हक्कांविषयी कळवळा आहे. त्यामुळंच अनेकदा पंतप्रधान मोदी हे जाहीरपणे अश्रू ढाळताना जगानं पाहिलं आहे. त्या संवेदनशील मोदी यांना चिरडून ठार केलेल्या शेतकऱ्यांविषयी संवेदना व्यक्त करू नयेत याचं आश्चर्य वाटतं,’ असा टोलाही शिवसेनेनं हाणला आहे.