बेजबाबदारपणे वागाल तर पुन्हा एकदा कडक लॉकडाऊन अटळ; ICMR चा इशारा
हायलाइट्स:
- महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यात ६१ गावांमध्ये लॉकडाऊन
- गरज नसेल तर प्रवास टाळा, ICMR चा इशारा
- येत्या फेब्रुवारी, मार्चमध्ये करोना संक्रमणाची तिसरी लाट?
महाराष्ट्रात अहमदनगर जिल्ह्यात ६१ गावांमध्ये लॉकडाऊन
आयसीएमआर आणि लंडनच्या इम्पिरिअल कॉलेजच्या संशोधकांनी केलेल्या एका अभ्यासानुसार, ‘रिव्हेंज ट्रॅव्हल’मुळे भारताला करोना संक्रमणाच्या तिसऱ्या लाटेचा धोका उद्भवू शकतो. त्यामुळे, पुन्हा एकदा देशाला लॉकडाऊनची गरज भासू शकते. उल्लेखनीय म्हणजे, एकीकडे देशात लॉकडाऊनचं ग्रहण उठत असतानाच दुसरीकडे वाढत्या करोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील ६१ गावांमध्ये संपूर्ण लॉकडाऊन घोषित करण्यात आलाय.
फेब्रुवारी – मार्च महिन्यात तिसरी लाट?
या अभ्यासानुसार, येत्या वर्षी फेब्रुवारी आणि मार्च दरम्यान करोना संक्रमणाच्या आकड्यांत पुन्हा एकदा वाढ दिसून येऊ सकते.
गेल्या दीड वर्षांपासून घराबाहेर पडणं शक्यतो टाळणाऱ्या व्यक्ती येत्या काही महिन्यांत फिरण्याची संधी साधू शकतात. यामुळेच विमान तिकीटं आणि हॉटेलचं बुकींग मोठ्या प्रमाणात झालेलं दिसून येतंय. या पार्श्वभूमीवर, पर्यटकांशिवाय स्थानिक रहिवासी आणि प्रशासनाला आपली जबाबदारी वेळीच ओळखावी लागेल, असा इशारा आयसीएमआरकडून देण्यात आला आहे.
पर्यटनस्थळांना सतर्कतेचा इशारा
‘जर्नल ऑफ ट्रॅव्हल मेडिसीन’मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या अभ्यासानुसार, देशांतर्गत पर्यटनाचा करोना संक्रमणावर परिणाम अभ्यासण्यासाठी एक मॉडल तयार करण्यात आलंय. यानुसार, पर्यटनांसाठी प्रसिद्ध असणाऱ्या हिमाचल प्रदेशसारख्या राज्यांत करोना संक्रमण फैलावण्याची शक्यता व्यक्त करण्यात आलीय.
हिमाचल प्रदेशच्या आकडेवारीनुसार, सामान्य हॉलिडे सीझनममध्ये पर्यटकांमुळे राज्यात ४० टक्के नागरिकांची वाढ होते. ही परिस्थिती लक्षात घेतली तर सणासुदीच्या दिवसांत तिसऱ्या लाटेचा धोका ४७ टक्क्यांपर्यंत वाढू शकतो. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, कुटुंबासोबत प्रवास करणारे नागरिक राहण्याच्या ठिकाणावर अधिक खर्च करतात.
नागरिकांना पर्यटनासाठी देण्यात आलेली सूट तिसरी लाट उद्भवण्यासाठी पुरेशी असल्याचं संशोधकांचं म्हणणं आहे. सामाजिक, राजकीय किंवा धार्मिक आयोजनांमुळे ही तिसरी लाट आणखीन घातक होऊ शकते.
पर्यटकांना आवाहन
संशोधकांच्या म्हणण्यानुसार, पर्यटकांनी जबाबदारी ओळखून आपला प्रवास करावा. कोविड चाचणी करून निगेटिव्ह रिपोर्टसोबतच लसीकरणाचंही प्रमाणपत्र जवळ बाळगावं. प्रवासासंबंधीचा धोका कमी करण्यासाठी राज्यांना माहिती देण्यात यावी. तसंच नागरिकांना गरज नसताना प्रवास करणं टाळण्याचा सल्ला दिला आहे.