Kolhapur Flood Update: ‘जखमेवर मीठ चोळायला आलाय का?’; केंद्रिय पथकाला घड्याळ भेट देण्याचा प्रयत्न!


हायलाइट्स:

  • केंद्रिय पाहणी पथक कोल्हापुरातील अतिवृष्टीग्रस्त भागाच्या दौऱ्यावर.
  • अडीच महिन्याने आलेल्या केंद्रिय पथकाला घड्याळ भेट देण्याचा प्रयत्न
  • शिरोळ तालुक्यात वादावादी, जखमेवर मीठ चोळायला आलाय का?

कोल्हापूर: महापूर येऊन तब्बल अडीच महिने उलटून गेल्यानंतर केंद्रिय पाहणी पथकाने अतिवृष्टी व महापुरामुळे नुकसान झालेल्या शिरोळ, कुरुंदवाड व नृसिंहवाडी येथील शेती पिके, घरे व दुकानांची पाहणी केली. दरम्यान, उशिरा पाहणी करण्यास आलेल्या समितीला स्वाभिमानी शेतकरी संघटनेने घड्याळ भेट देवून पुष्पहार घालून स्वागत करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्यांना रोखल्याने वादावादी झाली. ( Central Team In Kolhapur Updates )

वाचा: शिर्डीचं साई मंदिरही उघडणार; गाइडलाइन्स जारी, दर्शनासाठी ‘ही’ अट नाही!

दक्षिण महाराष्ट्रातील सांगली, कोल्हापूर व सातारा जिल्ह्यांत प्रचंड पावसाने महापूर आला होता. २२ जुलैला आलेल्या या महापुराने या भागात शेतीसह इतर अनेक बाबींचे मोठे नुकसान झाले. अजूनही पूरग्रस्तांना भरपाई मिळाली नाही. यामुळे ते आंदोलनाच्या तयारीत आहेत. अशावेळी आज केंद्रिय पथकाने शिरोळ तालुक्यात विविध ठिकाणी भेट देवून पाहणी केली. शिरोळ येथील ऊस शेती पिकाची पाहणी करत येथील शेतकरी गिरीश कवळेकर व कृषी मित्र युसुफ सिकंदर किरणे व अन्य उपस्थित नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी पथक प्रमुख रेवनिष कुमार यांनी संवाद साधला. यावेळी अतिवृष्टी व महापुरामुळे शिरोळ भागात नुकसान झालेल्या शेती पिकांची माहिती संबंधित शेतकऱ्यांकडून त्यांनी घेतली. शेतकऱ्यांनी मागील तीन वर्षांपासून नियमितपणे पूर येत असून यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी केली. तसेच वेळेत सानुग्रह अनुदान द्यावे, अशीही त्यांनी मागणी केली. या भागातील सर्व शेती पिके किमान दहा ते पंधरा दिवस पुराच्या पाण्याखाली होती व ऊस वरून जरी हिरवा दिसत असला तरी आतून पूर्णपणे नासून गेला असून त्याला फंगस लागलेला आहे. त्याचा काढणी खर्चही करू शकत नाही, अशी कैफियत शेतकऱ्यांनी पथकातील सदस्यांसमोर मांडली.

वाचा: आर्यन खान, अरबाज मर्चंटला ओळखत नाही!; मूनमूनने केला ‘हा’ दावा

कुरुंदवाड येथील ग्रामस्थ महेश दिवाजी जेवापे यांच्याशी केंद्रीय पाहणी पथकातील सदस्यांनी संवाद साधला. यावेळी जेवापे यांनी महापुरात त्यांचे घर व जनावरांच्या गोठ्यातील २ म्हैशी वाहून गेल्याची माहिती दिली. तसेच बचाव पथकाने कुटुंबातील सदस्यांना बोटीद्वारे सुरक्षित ठिकाणी वेळीच हलविले, असे त्यांनी सांगितले. तर नृसिंहवाडीमध्ये महापुरामुळे दुकानांमध्ये पाणी जाऊन विविध दुकानदारांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याची माहिती व्यापारी संघटनेने केंद्रीय पथकाची भेट घेऊन दिली. यावेळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी शिरोळ, कुरुंदवाड व नृसिंहवाडी येथील शेतकऱ्यांचे, दुकानदारांचे व घरांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण झालेले असून केंद्र शासनाकडून मदत मिळाल्यास त्यांना त्याचे वितरण करता येईल, असे सांगितले.

वाचा: पुणे विमानतळ ‘या’ तारखेपासून १५ दिवस राहणार बंद; ‘हे’ आहे कारण

दरम्यान, महापुरानंतर समिती तब्बल अडीच महिन्याने पाहणी करायला आल्याने आता येथे काय पाहणार, असा सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केला. या समितीला घड्याळ भेट देवून त्यांचे स्वागत करण्यासाठी संघटनेनेचे कार्यकर्ते गेले होते. पोलिसांनी त्यांना अडवले. यावेळी पोलीस आणि कार्यकर्ते यांच्यात वादावादी झाली. इथे काय बघणार, आमच्या जखमेवर मीठ चोळायला आलाय का, असा सवाल यावेळी सागर शंभूशेटे, सचिन शिंदे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी केला. वरिष्ठ सनदी अधिकारी रेवनिष कुमार यांच्या नेतृत्वाखालील या पथकात नागपूर येथील जलशक्तीचे अधीक्षक अभियंता महेंद्र सहारे, नवी दिल्ली येथील ऊर्जा विभागाच्या उपसंचालक पूजा जैन, मुंबई येथील रस्ते परिवहन विभागाचे कार्यकारी अभियंता देवेंद्र चापेकर, सनदी अधिकारी प्रताप जाधव यांचा समावेश आहे. पाहणी दौऱ्यात कोल्हापूर जिल्ह्यातील विविध विभागाचे प्रमुख पथकासोबत उपस्थित होते.

वाचा: मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर आणखी एका घोटाळ्याचा आरोप!



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: