अकोल्याचा गड वंचित बहुजन आघाडीनं राखला; पोटनिवडणुकीत ६ जागांवर यश


हायलाइट्स:

  • अकोला जिल्हा परिषद पोटनिवडणुकीचे निकाल जाहीर
  • वंचित बहुजन आघाडीची सरशी; सहा जागांवर बाजी
  • जिल्हा परिषदेतील सत्ताही कायम राहणार

अकोला: जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकीत अॅड. प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीनं सर्वाधिक सहा जागा जिंकत ताकद दाखवून दिली आहे. सहा जागा जिंकल्यामुळं वंचितची जिल्हा परिषदेतील सत्ताही कायम राहणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. आघाडी करून निवडणूक लढणाऱ्या शिवसेना व राष्ट्रवादीच्या वाट्याला अवघ्या तीन जागा आल्या आहेत. (Akola Zilla Parishad Election Results)

अकोला जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकीमुळं वंचित बहुजन आघाडीची सत्ता पणाला लागली होती. काठावरच्या बहुमतानं सत्तेत आलेल्या वंचित बहुजन आघाडीला ओबीसी सदस्यांचं पद रद्द झाल्याचा सर्वाधिक फटका बसला होता. त्यातच शस्त्रक्रिया झाल्यानं प्रकाश आंबेडकर हे निवडणुकीच्या प्रचारात सहभागी होऊ शकले नाहीत. त्यांच्या अनुपस्थितीत स्थानिक नेत्यांना सत्ताधारी शिवसेना-राष्ट्रवादी व बलाढ्या भाजपशी सामना करावा लागला. त्यात वंचितनं बाजी मारली आहे.

वाचा: राहुल व प्रियंका गांधींमध्ये इतकी सुद्धा परिपक्वता नाही की…; माजी खासदाराचा हल्लाबोल

अकोल्यात १४ जागांवर पोटनिवडणूक झाली होती. त्यापैकी सहा जागांवर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार विजयी झाले आहेत. तर, राज्यातील सत्ताधारी शिवसेनेला एक, राष्ट्रवादीला दोन जागा मिळाल्या आहेत. भाजप, काँग्रेस व बच्चू कडू यांची प्रहार संघटनेला प्रत्येकी एका जागेवर समाधान मानावं लागलं. तर, दोन जागी अपक्षांनी बाजी मारली.

वाचा: महाराष्ट्रात अशी घटना कदाचित पहिल्यांदाच घडली असेल, इचलकरंजीत काय झालं पाहा!

अकोट तालुक्यातील कुटासा मतदार संघाकडं राजकीय वर्तुळाचं लक्ष लागून होतं. इथं आमदार अमोल मिटकरी, आमदार रणधीर सावरकर यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. तिथं वेगळं चित्र पाहायला मिळालं. या मतदारसंघात प्रहारच्या स्फूर्ती निखिल गावंडे विजयी झाल्या आहेत. या विजयामुळं बच्चू कडू यांच्या पक्षाची जिल्हा परिषदेत एन्ट्री झाली आहे. तर, अकोट तालुक्यातील अडगाव बु. मध्ये वंचितचे माजी जिल्हा परिषद सदस्य गोपाल कोल्हे यांनी बंडखोरी करत पत्नी प्रमोदिनी यांना उभे केले होते. त्यांनीही विजय मिळवला आहे.

कोणाला किती जागा?

वंचित बहुजन आघाडी : ६
शिवसेना : १
भाजप : १
काँग्रेस : १
राष्ट्रवादी : २
अपक्ष : २
प्रहार : १

विजयी उमेदवारांची नावे:

अकोलखेड : जगन्नाथ निचळ (शिवसेना), घुसर : शंकरराव इंगळे (वंचित), लाखपुरी : सम्राट डोंगरदिवे (अपक्ष), अंदूरा : मीना बावणे (वंचित), दगडपारवा : सुमन गावंडे (राष्ट्रवादी), अडगाव : प्रमोदीनी कोल्हे (अपक्ष), कुरणखेड : सुशांत बोर्डे (वंचित), बपोरी : माया कावरे , भाजप), शिर्ला : सुनील फाटकर (वंचित), देगाव : राम गव्हाणकर (वंचित), कानशिवणी : किरण अवताडे मोहोड (राष्ट्रवादी), दानापूर : गजानन काकड (काँग्रेस), कुटासा : स्फूर्ती गावंडे (प्रहार), तळेगाव बु. : संगिता अढाऊ (वंचित.)



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: