चर्चा तर होणारच! राकेश झुनझुनवालांनी घेतली पीएम मोदींची भेट, अर्थमंत्र्यांशी केली चर्चा, नेटिझन्सच्या भुवया उंचावल्या


हायलाइट्स:

  • झुनझुनवाला यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची भेट घेतली.
  • या भेटीगाठींबद्दल नेटिझन्समध्ये चर्चांना उधाण आले आहे.
  • पंतप्रधान नरेंद्र मोदींनी झुनझुनवाला यांचे भरभरून कौतुक केले.

नवी दिल्ली : ज्यांच्या एखाद्या सूचक विधानाने किंवा कृतीचे थेट भांडवली बाजारात पडसाद उमटतात, असे देशातील प्रसिद्ध गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला सध्या सोशल मीडियावर वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आले आहेत. झुनझुनवाला यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची भेट घेतली आहे. त्यांच्या या भेटीगाठींबद्दल नेटिझन्समध्ये चर्चांना उधाण आले आहे.

राकेश झुनझुनवाला आणि रेखा झुनझुनवाला या दाम्पत्याने यांनी मंगळवारी संध्याकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत भेट घेतली. याबाबत पंतप्रधान मोदी यांनी ट्विट करून या भेटीचा फोटो शेअर केला आहे. या भेटीत मोदींनी झुनझुनवाला यांचे भरभरून कौतुक केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटमध्ये झुनझुनवाला यांच्याबाबत कौतुकास्पद उल्लेख केला आहे. काही आठवड्यांपूर्वी झुनझुनवाला यांनी किरकोळ गुंतवणूकदारांना अमेरिकेऐवजी भारतीय बाजारात गुंतवणूक वाढवा, असे आवाहन केले होते. त्याबाबत मोदी यांनी झुनझुनवाला यांचे कौतुक केल्याचे बोलले जाते.

मात्र याच भेटीचा आणखी एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यात झुनझुनवाला खुर्चीवर बसले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्यासमोर उभे राहून चर्चा करत आहेत. या फोटोवरून अनेकांनी बड्या भांडवलदाराची ऐट, पंतप्रधान एका गुंतवणूकदारासमोर उभे राहिले अशा प्रकारच्या कमेंट करून निषेध केला. तर काहींनी अशा ट्विटला प्रतिसाद देत, झुनझुनवाला यांच्या तब्बेतीचे आणि आजारपणाचे कारण दिले. काहींनी झुनझुनवाला यांच्या साधेपणाचे कौतुक केल आहे.

दरम्यान, राकेश झुनझुनवाला यांनी शिष्टमंडळासह आज बुधवारी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची देखील भेट घेतली. काल पंतप्रधान आणि आज अर्थमंत्री अशा भेटीगाठी घेतल्याने या विषयी नेटिझन्स आणि कोर्पोरेट्समध्ये तर्कवितर्क लढवले जात आहे. काही महिन्यांपूर्वी झुनझुनवाला यांनी विमान सेवेत उतरण्याचे जाहीर केले होते. त्यादृष्टीने त्यांनी मोठी गुंतवणूक देखील केली आहे. या संदर्भात भेट झाल्याची चर्चा दबक्यात आवाजात कॉर्पोरेट जगतात सुरु आहे.

करोना संकटाशी यशस्वी सामना करुन उभारी घेणाऱ्या भारतीय अर्थव्यवस्थेबाबत झुनझुनवाला प्रचंड आशावादी आहेत. त्यांनी अनेकदा जाहीरपणे भारतीय अर्थव्यवस्था नजीकच्या काळात वेगाने वाढेल, असे दावे केले आहेत. मागील काही वर्षात केंद्र सरकराने केलेल्या आर्थिक सुधारणांबाबत देखील झुनझुनवाला यांनी कौतुक केले आहे. त्यामुळे झुनझुनवाला यांच्या दिल्लीतील भेटीगाठींना भांडवली बाजाराच्या दृष्टिने महत्व आहे.झुनझुनवाला आणि त्यांच्या कुटुंबीयांची एकूण २२३०० कोटींची संपत्ती आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: