Explainer रेणू निर्माण करणाऱ्या यंत्राला का मिळाला यंदाचा रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कार


स्टॉकहोम: नवे रेणू तयार करण्यासाठी ‘सेंद्रिय उत्प्रेरणा’चे (ऑरगॅनोकॅटालिसिस) तंत्र विकसित करणारे डॉ. बेंजामिन लिस्ट आणि डॉ. डेव्हिड मॅकमिलन यांना २०२१चे रसायनशास्त्राचे नोबेल जाहीर झाले आहे. रासायनिक अभिक्रियेला गती देणाऱ्या पर्यावरणपूरक आणि स्वस्त पद्धतीमुळे औषधनिर्माण क्षेत्राला मोठा फायदा झाला असल्याचे नोबेल निवड समितीने म्हटले आहे. रॉयल स्वीडिश अकॅडमी ऑफ सायन्सेसतर्फे बुधवारी यंदाच्या रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. डॉ लिस्ट जर्मनीतील मॅक्स प्लॅन्क, तर डॉ. मॅकमिलन अमेरिकेतील प्रिन्स्टन विद्यापीठात कार्यरत आहेत. जाणून घेऊयात त्यांच्या या संशोधनाविषयी…


रसायन शास्त्रातील नोबेल पुरस्कार विजेते शास्त्रज्ञ कोण?

डॉ. बेंजामिन लिस्ट : जर्मनीतील फ्रँकफर्ट येथे १९६८ मध्ये जन्मलेल्या लिस्ट यांचे पीएचडीचे शिक्षण फ्रँकफर्ट येथील गोएथ विद्यापीठातून झाले. ऑरगॅनिक केमिस्ट्री हा त्यांचा विषय असून, ते सध्या मॅक्स प्लॅन्क इन्स्टिट्यूट फॉर कोल रिसर्चचे संचालक आहेत.

डॉ. डेव्हिड डब्ल्यू. सी. मॅकमिलन : १९६८ मध्ये स्कॉटलंड येथे जन्मलेल्या मॅकमिलन यांनी अमेरिकेतील कॅलिफोर्निया विद्यापीठातून १९९६ मध्ये पीएचडी पूर्ण केली. २००६ पासून ते प्रिन्स्टन विद्यापीठात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. रसायनशास्त्रातील प्रख्यात नियतकालिक ‘केमिकल सायन्स’चे संपादक म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे.

हवामानाचे कोडे उलगडण्यासाठी भौतिकशास्त्राचे नोबेल; जाणून घ्या संशोधनाविषयी
नोबेल विजेत्या संशोधनाविषयी

सर्व प्रकारच्या उद्योगांमध्ये विशिष्ट गुणधर्म असणाऱ्या रेणूंची आवश्यकता असते. आपल्याला हवे असलेले रेणू निसर्गातून शोधणे अत्यंत कठीण असल्यामुळे ते रेणू प्रयोगशाळेत तयार करण्याचा प्रयत्न रसायन शास्त्रज्ञ करतात. रेणू निर्मितीच्या रासायनिक अभिक्रियेत त्या अभिक्रियेचा वेग वाढवण्यासाठी उत्प्रेरकांची (कॅटॅलिस्ट) गरज असते. सर्वसाधारणपणे धातू आणि एन्झाइम हे प्रकारचे उत्प्रेरक रासायनिक अभिक्रियांमध्ये वापरले जातात. डॉ. लिस्ट आणि डॉ. मॅकमिलन यांनी रासायनिक अभिक्रियेमध्ये वापरण्यात येणाऱ्या तिसऱ्या प्रकारच्या- सेंद्रिय उत्प्रेरकांचा शोध लावला.

‘असिमेट्रिक ऑरगॅनोकॅटॅलिसिस’ म्हणजे काय?

रासायनिक अभिक्रियेतून रेणू तयार होताना अनेकदा त्या रेणूंच्या बहुतांश समान गुणधर्म असणाऱ्या आवृत्त्या तयार होतात. मात्र, त्यातून आपल्याला नेमकेपणाने आवश्यक असणारा रेणू वेगळा करण्यासाठी असिमेट्रिक कॅटॅलिसिस ही प्रक्रिया वापरली जाते. यात उत्प्रेरक म्हणून सेंद्रिय रेणूंचा यशस्वी वापर लिस्ट आणि मॅकमिलन करून दाखवला. या प्रक्रियेचे नामकरण असिमेट्रिक ऑरगॅनोकॅटॅलिसिस असे करण्यात आले. याच प्रक्रियेला यंदाचे नोबेल जाहीर झाले आहे.

…म्हणून करोना लस संशोधकांऐवजी ‘या’ संशोधकांना मिळाला वैद्यकीय क्षेत्रातील नोबेल!
सेंद्रिय रेणूंचा वापर

रासायनिक अभिक्रियेत उत्प्रेरक म्हणून धातू प्रभावीपणे काम करतात. मात्र, धातूंवर ऑक्सिजन आणि पाण्याची प्रक्रिया होत असल्यामुळे उद्योगांमध्ये मोठ्या प्रमाणात धातूंचा उत्प्रेरक म्हणून वापर करणे अवघड असते. एन्झाइममध्ये अनेक अमिनो ऍसिडचा समावेश असतो. मात्र, प्रत्यक्ष रासायनिक अभिक्रियेत त्यांतील मोजकेच अमिनो ऍसिड उत्प्रेरक म्हणून सहभागी होतात. लिस्ट आणि मॅकमिलन यांनी याच स्थितीचा अभ्यास करून कार्बन आणि त्याच्याशी संलग्न असणाऱ्या ऑक्सिजन, नायट्रोजन, सल्फर, फॉस्फरस आदींचा वैशिष्ट्यपूर्ण समावेश असणाऱ्या सेंद्रिय रेणूंचा वापर रासायनिक अभिक्रियेत उत्प्रेरक म्हणून केला.

संशोधनाची उपयुक्तता

हे रेणू सहज आणि मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतात, पर्यावरणपूरक असतात आणि उद्योगांमध्ये त्यांचा वापर मोठ्या प्रमाणात शक्य आहे. असिमेट्रिक ऑरगॅनोकॅटॅलिसिसमुळे रसायन आणि जीवशास्त्राशी संबंधित उद्योगांमध्ये उत्पादनात कित्येक पटींनी वाढ झाली. औषध निर्माण क्षेत्राला या उत्प्रेरणाचा विशेष फायदा झाला.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: