bjp national executive : भाजप राष्ट्रीय कार्यकारिणीतून गांधी मायलेकांना डच्चू, महाराष्ट्रातील ‘या’ नेत्यांची वर्णी


नवी दिल्लीः भाजपने राष्ट्रीय कार्यकारिणीची घोषणा केली आहे. पीलीभीतचे खासदार वरुण गांधी यांना कार्यकारिणीतून डच्चू देण्यात आला आहे. भाजपच्या ज्येष्ठ नेत्या आणि वरुण गांधींची आई मनेका गांधींनाही कार्यकारिणीत स्थान देण्यात आलेलं नाही. वरुण गांधी हे सरकारच्या धोरणांच्या विरोधात बोलत आहेत. लखीमपूर खिरी हिंसाचार प्रकरणी त्यांनी सरकार विरोधात वक्तव्य केले आहे.

लखीमपूर खिरीतील हिंसाचाराच्या घटनेचा नवीन व्हिडिओ समोर आल्यानंतर वरुण गांधींनी आजही ट्विट केले आहे. व्हिडिओ पूर्णपणे स्पष्ट आहे. विरोध करणाऱ्यांची हत्या करून त्यांना शांत केले जाऊ शकत नाही. निष्पाप शेतकऱ्यांचे रक्त सांडणाऱ्यांना जबाबदार धरले पाहिजे. सरकारविरोधात अहंकार आणि क्रूरतेचा संदेश शेतकऱ्यांपर्यंत जाण्यापूर्वी त्यांना न्याय दिलाच पाहिजे, असं वरुण गांधी ट्विटमध्ये म्हणाले.

जे. पी. नड्डांनी जाहीर केली राष्ट्रीय कार्यकारिणी

भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी गुरुवारी पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची घोषणा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांच्यासह ८० नेत्यांना सदस्य म्हणून नामांकित करण्यात आले आहे. भाजप सरचिटणीस अरुण सिंह यांनी पत्रकाद्वारे कार्यकारिणीची माहिती दिली आहे. कार्यकारिणीमध्ये ५० विशेष आमंत्रित आणि १७९ कायमस्वरूपी आमंत्रित (पदभार) असतील. ज्यात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विधिमंडळ पक्षाचे नेते, माजी उपमुख्यमंत्री, राष्ट्रीय प्रवक्ते असतील. , राष्ट्रीय मोर्चा अध्यक्ष, राज्यांचे प्रभारी, सह-प्रभारी, प्रदेशाध्यक्ष, राज्य सरचिटणीस संघटना आणि आयोजक यांचा समावेश आहे.

भाजपची राष्ट्रीय कार्यकारिणी विविध विषयांवर चर्चा करते आणि संघटनेच्या कामकाजाची दिशा ठरवते. कोविड -१९ च्या संसर्गामुळे राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक बऱ्याच काळापासून झालेली नाही. कार्यकारिणीच्या जाहीर झालेल्या सदस्यांमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, परिवहन मंत्री नितीन गडकरी, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, अर्थमंत्री निर्मला सीतारमण, नागरी उड्डयन मंत्री ज्योतिरादित्य शिंदे आणि शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री, खासदार आणि वरिष्ठ नेते यांचा समावेश आहे. माजी मंत्री हर्षवर्धन, प्रकाश जावडेकर आणि रविशंकर प्रसाद यांनाही कार्यकारिणीत स्थान देण्यात आले आहे.

महाराष्ट्रातील नेत्यांची कार्यकारिणीत वर्णी

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री पियूष गोयल, माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, खासदार विनय सहस्त्रबुद्धे यांचा कार्यकारिणीत समावेश आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रात महिंलाच्या मुद्द्यावर महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारला घेरणाऱ्या चित्रा वाघ यांचीही कार्यकारिणीत वर्णी लागली आहे. त्याही कार्यकारिणीच्या सदस्य झाल्या आहेत.

माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाराज असल्याची चर्चा असलेल्या भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांची राष्ट्रीय सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तसंच सुनील देवधरही राष्ट्रीय सचिव झाले आहेत. विशेष निमंत्रितांमध्ये महाराष्ट्राचे माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, मुंबई भाजपचे नेते आशिष शेलार आणि लढ्ढाराम नागवानी यांचा समावेश आहे. राष्ट्रीय प्रवक्ते म्हणून मुंबईच्या संजू वर्मा आणि नंदुरबारच्या खासदार हिना गावीत यांना जबाबदारी दिली आहे. जमाल सिद्दीकी यांना अल्पसंख्यांक मोर्चाचे अध्यक्षपद दिले गेले आहे.

पंकजा, तावडे, देवधर झाले राज्यांचे प्रभारी

सुनील देवधर यांच्यावर भाजप नेतृत्वाने आंध्र प्रदेशची जबाबदारी दिली आहे. त्यांना आंध्र प्रदेशचे प्रभारी पद दिले आहे. विनोद तावडे यांना हरयाणाचे प्रभारी तर पंकजा मुंडे यांना मध्य प्रदेशचे प्रभारी करण्यात आले आहे. तर सी. टी. रवी, ओमप्रकाश धुर्वे आणि जयभान सिंह पवय्या यांना महाराष्ट्राचे प्रभारी म्हणून नेमण्यात आले आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: