तिसऱ्या लाटेला परतवून लावण्यासाठी महाराष्ट्राची तयारी सुरु

तिसऱ्या लाटेला परतवून लावण्यासाठी महाराष्ट्राची तयारी सुरु Maharashtra begins preparations to bring back the third wave
कोरोना स्थितीचा आढावा
मुंबई, 05/05/2021 - केंद्र सरकारच्या मुख्य वैज्ञानिक सल्लागारांनी भारतात तिसरी लाट येण्याचा अंदाज वर्तवल्याचे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, या तिसऱ्या लाटेला परतवून लावण्यासाठी महाराष्ट्राने गेल्या काही दिवसांपासून तयारी सुरु केली आहे.यात आरोग्य सुविधा न थांबता वाढवण्याच्या आपण सूचना दिल्या असल्याचे ते म्हणाले. आज महाराष्ट्राप्रमाणे इतर काही राज्यही कडक निर्बंध किंवा लॉकडाऊन लावत असल्याची माहिती त्यांनी दिली.
लस उपलब्धतेप्रमाणे लसीकरण,गर्दी करू नका
  केंद्र सरकारने १८ ते ४४ वयोगटातील लसीकरणाची जबाबदारी राज्यावर टाकली असून यातील ६ कोटी लोकसंख्येला दोन डोस याप्रमाणे १२ कोटी डोस एकदम विकत घेण्याची राज्य शासनाची तयारी असली तरी लस उपलब्ध होण्याला मर्यादा आहे. केंद्र सरकारचीही याबाबत मर्यादा आहे कारण लसीचे उत्पादन हळू हळू वाढत आहे. त्यामुळे जस जशी राज्याला लस उपलब्ध होईल तस तसे या वयोगटातील नागरिकांचे लसीकरण केले जाईल, नागरिकांनी संयम आणि शिस्त पाळावी, गर्दी करू नये असे आवाहन ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.
सर्वोच्च न्यायालयाने केले मुंबई महापालिकेचे कौतुक
 मुख्यमंत्र्यांनी सर्वोच्च न्यायालयाने आज मुंबई महापालिकेने केलेल्या कोरोना नियंत्रणाच्या कामाचे कौतुक केल्याचे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, याचे सगळे श्रेय हे आपल्या सर्वांना जाते. आपल्या सहकार्यामुळे आणि शिस्ती मुळे हे शक्य झाले आहे. राज्यात आजघडीला कोरोना रुग्णसंख्येत किंचित कमी येतांना दिसत असली तरी आपल्याला गाफील राहून चालणार नाही हे ही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले तसेच राज्याच्या काही जिल्ह्यांमधील वाढत्या रुग्णसंख्ये बाबत चिंता व्यक्त करतांना जिल्हा, तालुका आणि वाड्या वस्तीमध्ये काम करणाऱ्या डॉक्टरांना राज्य टास्कफोर्समधील डॉक्टरांचे मार्गदर्शन देण्यात येत असून रुग्णांना कोणत्यावेळी कोणते औषध किती प्रमाणात द्यायचे, गृह विलगीकरणात असलेल्या रुग्णांची काळजी कशी घ्यायची, त्यांना योग्य उपचार देतांना योग्य वेळेत गरज पडल्यास दवाखान्यात दाखल कसे करायचे याची माहिती दिली जात असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
मिशन ऑक्सीजन

महाराष्ट्रात कडक निर्बंध लावल्याने २५ एप्रिल २०२१ रोजीची ७ लाखाची रुग्णसंख्या आता ६ लाख ४१ हजार इतकी कमी करण्यात यश मिळाले असले तरी काही जिल्ह्यात रुग्णवाढ होत आहे. आपण ४.५ लाख रुग्णशैय्या राज्यभरात निर्माण केल्या आहेत. त्यात १ लाख ऑक्सीजन बेडस् आहेत, ३० हजार आयसीयु तर १२ हजार व्हेंटीलेटर बेडस् आहेत अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. राज्यात १२०० मे.टन ऑक्सीजन उत्पादित होतो. आपल्याला १७०० मे.टन ऑक्सीजन रोज लागतो. वरचे ५०० मे.टन ऑक्सीजन इतर राज्यातून महाराष्ट्राला देण्यास केंद्राने मंजूरी दिली आहे. आता तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेऊन राज्य शासनाने मिशन ऑक्सीजन अंतर्गत स्वावलंबी करण्याचे उद्दिष्ट ठेवले असून रोज ३ हजार मे.टन ऑक्सीजन उत्पादनाच्यादृष्टीने ऑक्सीजन निर्मिती प्लांटसची उभारणी करण्यात येत असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. केंद्र सरकार रेमडेसिवीरचा पुरवठा हळू हळू वाढवत असले तरी तो आवश्यक तेवढा नाही हे ही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. तिसऱ्या लाटेचा घातक परिणाम राज्यावर होणार नाही याचा चंग महाराष्ट्राने बांधला असल्याचेही मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: