निविदा उघडल्या ; अखेर टाटाच ठरले एअर इंडियाचे तारणहार, इतक्या कोटींना झाला सौदा


हायलाइट्स:

  • एअर इंडियासाठी टाटा सन्स या कंपनीची निविदा मंजूर करण्यात आली आहे.
  • एअर इंडियासाठी १८००० कोटीची बोली टाटा समूहाने लावली.
  • एअर इंडियावर एकूण ३८,३६६.३९ कोटी रुपयांचे कर्ज आहे.

नवी दिल्ली : कर्जात बुडालेल्या सरकारी विमान कंपनी एअर इंडियासाठी टाटा सन्स या कंपनीची निविदा मंजूर करण्यात आली आहे. आज शुक्रवारी केंद्र सरकारने याबाबत अधिकृत घोषणा केली. विशेष म्हणजे जेआरडी टाटा यांनी १९३२ मध्ये टाटा एअरलाइन्सची स्थापना केली होती. तर १९५३ मध्ये कंपनीचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले. आता सात दशकांनंतर पुन्हा एकदा एअर इंडियाची मालकी टाटा समूहाकडे आली आहे. एअर इंडियासाठी १८००० कोटीची बोली टाटा समूहाने लावली.
RBI ची मोठी घोषणा; डिजीटल व्यवहारांना दिले प्रोत्साहन, ‘IMPS’ बाबत घेतला हा निर्णय

टाटा समूहाकडून १८००० कोटीना एअर इंडिया खरेदी करण्यात आली आहे. त्यापैकी १५ टक्के रक्कम केंद्र सरकारला मिळणार असून उर्वरित रक्कम कर्ज फेडीसाठी वापरली जाणार आहे. टॅलेस प्रा. लिमिटेडने एअर इंडियामध्ये १०० टक्के हिस्सा खरेदी करण्याची बोली प्रस्ताव जिंकला आहे, असे गुंतवणूक आणि सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन विभागाचे सचिव तुहीन कांत पांडे यांनी सांगितले.

निविदा जिंकलेल्या कंपनीने सर्व अटी आणि शर्थी मान्य केल्या आहेत. या प्रक्रियेत पाच निविदा रद्द करण्यात आल्याचे पांडे यांनी सांगितले. निविदा प्रक्रिया उच्चअधिकार मंत्रीगटाच्या समितीने संमत केली. या समितीमध्ये गृहमंत्री अमित शहा, अर्थमंत्री निर्मला सीतारामन, नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंदिया यांचा समावेश होता.

एअर इंडियाकडे ३१ मार्च २०२० पर्यंत ४५,८६३.२७ कोटी रुपये आहेत. यामध्ये एअर इंडियाची जमीन, इमारती, विमानांचा ताफा आणि इंजिनांचा समावेश आहे. आर्थिक वर्ष २०१९-२० च्या उपलब्ध आकडेवारीनुसार, एअर इंडियावर एकूण ३८,३६६.३९ कोटी रुपयांचे कर्ज आहे. एअर इंडिया अॅसेट्स होल्डिंग लिमिटेडच्या स्पेशल पर्पज व्हेइकल (एसपीव्ही)ला एअरलाइन्सकडून २२,०६४ कोटी रुपये हस्तांतरित केल्यानंतर ही रक्कम राहते.

गेल्या वर्षी जानेवारीमध्ये निर्गुंतवणुकीची प्रक्रिया पुन्हा सुरू केली आणि एअर इंडिया एक्स्प्रेस लिमिटेडमधील एअर इंडियाच्या १०० टक्के भागांसह सरकारी मालकीच्या विमान कंपनीमध्ये त्यांचा १०० टक्के हिस्सा आणि एअर इंडिया एसएटीएस एअरपोर्ट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडमधील ५० टक्के इक्विटी विक्रीसाठी बोली आमंत्रित केल्या आहेत.

६८ वर्षांनंतर एअर इंडिया पुन्हा टाटांकडे
एअर इंडिया पूर्वी टाटा समूहाची कंपनी होती. या कंपनीची स्थापना जेआरडी टाटा यांनी १९३२ मध्ये केली होती. स्वातंत्र्यानंतर उड्डाण क्षेत्राचे राष्ट्रीयीकरण झाले आणि त्यामुळे सरकारने टाटा एअरलाइन्सचे ४९ टक्के शेअर्स खरेदी केले. त्यानंतर ही कंपनी पब्लिक लिमिटेड कंपनी बनली आणि २९ जुलै १९४६ रोजी कंपनीचे नाव बदलून एअर इंडिया असे करण्यात आले. १९५३ मध्ये सरकारने एअर कॉर्पोरेशन कायदा पास केला आणि कंपनीचे संस्थापक जेआरडी टाटा यांच्याकडून मालकी हक्क विकत घेतले. यानंतर, कंपनीला पुन्हा एअर इंडिया इंटरनॅशनल लिमिटेड असे नाव देण्यात आले. आता ६८ वर्षांनी पुन्हा एकदा टाटा समूहाने स्वतःची कंपनी परत मिळवणार आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: