उजनी जलाशयातुन शेतकरी नेत्यांना बाहेर काढण्याचा प्रशासनाचा मनसुबा यशस्वी

उजनी जलाशयातुन शेतकरी नेत्यांना बाहेर काढण्याचा प्रशासनाचा मनसुबा यशस्वी administrations plan to get farmer leaders out of the Ujani reservoir was successful
शेतकरी नेत्यांना बोलाविले पुण्याला तरीही पालकमंत्र्यासोबतची बैठक ढकलली पुढे
    कुर्डुवाडी, राहुल धोका - उजनीतील पाणी इंदापूरला वळविण्याच्या कारणामुळे सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी आक्रमक झाले आणि या पाणीचोरीच्या निषेधार्थ जिल्ह्यातील शेतकरी नेत्यांनी उजनी जलाशयात जलसमाधी घेण्याचा आक्रमक पवित्रा घेतला आणि उजनी जलाशयात उड्या मारल्या. पालकमंत्र्यांशी बैठक लावा आणि त्यासंबंधी लेखी पत्र द्या असा पवित्रा शेतकरी नेत्यांनी घेतला,त्यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे यांनी पत्र पाठवुन शुक्रवार दि. ७ रोजी पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी यांची नियोजन भवन,सोलापूर येथे बैठक लावली असल्याचे लेखी दिले. मात्र आज बैठक लांबवुन शेतकरी नेत्यांना पाण्याच्या बाहेर काढण्याचा प्रशासनाचा मनसुबा यशस्वी झाला असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे पाणी पळविण्याच्या षडयंत्रात शासनाबरोबर प्रशासन देखील सामिल आहे की काय..? असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

… अन्यथा याचे तीव्र पडसाद उमटतील
तारीक पे तारीक म्हणजे हि आंदोलनाची धार कमी करण्यासाठी पालकमंत्र्यांच्या आडून बारामती करांनी टाकलेला डाव आहे.सोलापूर जिल्ह्य़ातील शेतकऱ्यांना जिल्ह्यातच बैठकीला येणे सोईस्कर आसताना जाणीवपूर्वक ही बैठक पुणे जिल्ह्यात ठेवण्यात आली आहे. पालकमंत्री सोलापूरचा, जिल्हाधिकारी सोलापूरचे , शेतकरी सोलापूरचे आणि बैठक पुण्यात. जरी बैठक भले इंदापूर नाहीतर बारामतीत ठेवली तरी सोलापूरचा शेतकरी घाबरणार नाही. बैठक लांबवणे म्हणजे हा वेळकाढूपणा आहे जर आता सोमवारी ठरल्याप्रमाणे पुणे येथे बैठक न झाल्यास याचे जिल्ह्यात तीव्र पडसाद उमटतील. जेवढी बैठक लांबणार तेवढी या आंदोलनाची धार वाढत जाणार आहे आणि येणाऱ्या काळात आंदोलनाची धार आणखीन तीव्र करणार आहोत.

अतुल खुपसे पाटील ,अध्यक्ष, उजनी धरण पाणी बचाव संघर्ष समिती

याबाबत माहिती अशी की,सोलापूर जिल्ह्यातील उजनी जलाशयातील ५ टीएमसी पाणी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार व खासदार सुप्रिया सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी इंदापूरला वळविले आहे. यामुळे हक्काच्या पाण्यावर गदा येईल म्हणून जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला. उजनी जलाशयात पालकमंत्र्यांचा पुतळा बुडविला तर उजनी धरण पाणी बचाव संघर्ष समितीची स्थापना करुन जलसमाधी आंदोलन करण्याचा इशारा दिला. १ मे रोजी शेतकरी नेत्यांनी जलाशयात उड्या मारल्या. सकाळी ११ वाजता जलसमाधी आंदोलनाला सुरुवात झाली पोलीस प्रशासन आंदोलकांना बाहेर येण्याची विनंती करत होते मात्र आंदोलक लेखी पत्रावर ठाम होते. त्यावेळी माजी मंत्री सदाभाऊ खोत व आ. गोपीचंद पडळकर यांनी संपर्क करुन आंदोलकांची व्यथा जाणुन घेतल्या आणि प्रशासनाला फोन लावुन धारेवर धरले.

पालकमंत्र्यांना सोलापूरात बैठक घ्यायची भिती वाटते का..?
दि. ७ मे रोजी सोलापुरात बैठक लावल्यामुळे आम्ही आंदोलनाला स्थगिती दिली अन्यथा उजनी जलाशयातुन आमचे मुडदे बाहेर काढावे लागले असते. उद्याच्या बैठकीसंदर्भात आज आम्ही स्वत:हुन संपर्क साधला असता बैठक पुढे ढकलुन दि.१० रोजी सिंचन भवन पुणे येथे बैठक आयोजित केल्याचे कळविले. म्हणजे सोलापूरचे पाणी चोरुन नेणाऱ्या बारामतीकरांना सोलापुरात बैठक घ्यायची भिती वाटते का..? – माऊली हळणवर, सचिव,उजनी धरण पाणी बचाव संघर्ष समिती

दरम्यान निवासी उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे यांनी लेखी पत्र देवुन पालकमंत्री दत्तात्रय भरणे व जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याशी पाणी प्रश्नी बैठक लावली असल्याचे सांगुन बोळवण केली.उद्याच्या बैठकप्रश्नी आज ६ मे रोजी चौकशी केली असता उद्या दि. ७ मे रोजीची बैठक रद्द झाली असुन तहसिलदारांना याबाबत कळविले असल्याचे सांगण्यात आले. मात्र शेतकरी नेत्यांना सायंकाळी ६ पर्यंत कोणतीच कल्पना याबाबत देण्यात आली नव्हती. म्हणजे ‘त्यादिवशी’ केवळ आंदोलकांना बाहेर काढण्यासाठी पत्र दिले असल्याचे बोलले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: