पंढरपूर उपविभागातील जप्त वाळू साठ्याचा लिलाव

४५३ ब्रास जप्त वाळू साठ्याचा होणार लिलाव

पंढरपूर,दि.08/10/2021- पंढरपूर उप विभागातील जप्त केलेल्या अवैध वाळू साठ्याचा लिलाव करण्यात येणार असून,यामध्ये मोहोळ तालुक्यातील जप्त वाळू साठ्याचा लिलाव २१ ऑक्टोबर २०२१ रोजी सकाळी ११.०० वाजता तहसिल कार्यालय, मोहोळ तर पंढरपूर तालुक्यातील जप्त वाळू साठ्याचा लिलाव २२ ऑक्टोबर २०२१ रोजी सकाळी ११.०० वाजता उपविभागीय अधिकारी कार्यालय, पंढरपूर येथे आयोजित केला असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी गजानन गुरव यांनी दिली आहे.

     पंढरपूर उपविभागातील पंढरपूर व मोहोळ तालुक्यातील अवैध वाळू वाहतूक व साठ्यावर केलेल्या कारवाईत पंढरपूर तालुक्यातील  करकंब पोलीस ठाणे आवार येथे १७.६० ब्रास,पंढरपूर तालुका पोलीस ठाणे येथे १४५.५८ ब्रास,पंढरपूर ग्रामीण पोलीस आवार येथे ५८.२४ ब्रास तर पंढरपूर शहर पोलीस स्टेशन येथे ४९.९५ ब्रास असा एकूण २७१.३७ ब्रास वाळू साठा जप्त करण्यात आला आहे.या वाळू साठ्याची शासकीय किंमत १० लाख ४ हजार ६९ रुपये इतकी आहे. 

मोहोळ तालुक्यातील तहसिल कार्यालय आवारातील वाहना मधील ९०.०४ ब्रास तसेच कामती पोलीस स्टेशन येथे ९१.६७ ब्रास असा एकूण १८१.७१ ब्रास वाळू साठा जप्त करण्यात आला आहे. या वाळू साठ्याची शासकीय किंमत ६ लाख ७२ हजार ३२७ रुपये इतकी आहे.

सदर वाळू लिलावात भाग घ्यावयाचा अशा व्यक्तींनी संबंधित ठिकाणच्या वाळू साठ्याची पाहणी करावी.तसेच मोहोळ तालुक्यातील लिलावात भाग घेण्यासाठी बुधवार दिनांक २० ऑक्टोबर २०२१ रोजी तर पंढरपूर तालुक्यातील लिलावात भाग घेण्यासाठी गुरुवार दिनांक २१ ऑक्टोबर २०२१ रोजी सायंकाळी ५.००वाजेपर्यंत लेखी अर्ज उपविभागीय अधिकारी कार्यालय, पंढरपूर येथे सादर करावेत, असेही उपविभागीय अधिकारी गुरव यांनी सांगितले.

सदर लिलावात भाग घेण्यासाठी २५ टक्के रक्कम रोख अथवा डी.डी.द्वारे भरावी त्याचबरोबर अर्जाचे शुल्क रुपये दोन हजार विनापरतावा भरणे आवश्यक आहे.सर्वोत्तम बोलीची २५ टक्के रक्कम तात्काळ त्याच दिवशी शासकीय खजिन्यात चलनाद्वारे जमा करावी.तसेच बोलीच्या रक्कमे व्यतिकरक्त गौण खनिज निधी रक्कम १० टक्केचा धनादेश कार्यालयास सादर करणे आवश्यक आहे. बोलीची उर्वरित ७५ टक्के रक्कम शासकीय खजिन्यात सात दिवसाच्या आत भरल्यानंतर स्वतःकडील वाहनाद्वारे संबंधित ठिकाणावरून वाळू घेऊन जावी.लिलावात भाग घेणाऱ्या व्यक्तींनी अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावीत. नमूद ठिकाणी वेळेत उपस्थित राहावे असेही आवाहन उपविभागीय अधिकारी श्री .गुरव यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: