मुंबईत मोठी कारवाई : महिला ACP ला ४० हजार रुपयांची लाच घेताना अटक
हायलाइट्स:
- मुंबई पोलिसांना आणखी एक धक्का
- महिला अधिकारी एसीबीच्या जाळ्यात
- लाच घेताना अटक
सुजाता पाटील यांना ४० हजार रूपयांची लाच घेताना पकडण्यात आले. पाटील सध्या जोगेश्वरीच्या मेघवाडी विभागातील एसीपी म्हणून कार्यरत आहेत. भाडेकरूने कब्जा केलेली जागा परत मिळवून देण्यासाठी तसंच गुन्हा दाखल करून घेण्यासाठी पाटील यांनी १ लाख लाच मागितली होती. यातील ४० हजार रुपये स्वीकारताना पाटील यांना अटक करण्यात आली आहे.
सहायक पोलीस आयुक्त सुजाता पाटील या लाच मागत असल्याची तक्रार एसीबीकडे करण्यात आली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर एसीबीने सापळा रचला आणि लाच घेताना पाटील यांना पकडलं.
काही दिवसांपूर्वीच झाली होती बड्या अधिकाऱ्यावर कारवाई
गुन्हे शाखेच्या मालमत्ता कक्षातील सहायक पोलीस निरीक्षक नागेश पुराणिक यांना एसीबी पथकाने दोन लाख रूपयांची लाच घेताना सप्टेंबर महिन्यात अटक केली होती.
मालमत्ता कक्षाकडे बीएमडब्ल्यू कार चोरीचे प्रकरण तपासाकरता आहे. या गुन्ह्यात एका महिलेचे पती आणि त्यांचा मित्र यांचा सहभाग आढळत होता. या दोघांवर कारवाई न करण्यासाठी नागेश पुराणिक यांनी १२ लाखांची मागणी केली. पती आणि त्यांच्या मित्राला कारवाईपासून वाचवण्यासाठी महिलेने चार लाख रूपये काही दिवसांपूर्वी दिले. उर्वरीत आठ लाखांसाठी पुराणिक तगादा लावू लागले. एवढी रक्कम जमवणे शक्य नसल्याने तडजोडी अंती आणखी चार लाख रूपये देण्याचे ठरले. महिलेला चार लाखाची रक्कम जमा करणे अशक्य जात होते आणि पुराणिक पैशांसाठी मागे लागले असल्याने या महिलेने ॲन्टी करप्शन ब्युरोच्या कार्यालयात जाऊन तक्रार केली होती.