इस्लामाबाद : पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे नवनिर्वाचित अध्यक्ष रमीज राजा यांचा एक व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होऊ लागला आहे. सुमारे दीड मिनिटांच्या या व्हिडीओमध्ये रमीज राजा जे काही म्हणत आहेत, त्यावरून बीसीसीआय ही संस्था किती ताकदवर आहे, हे दिसून येते. जगभरातील सर्व क्रिकेट संस्थांची प्रमुख असलेल्या आयसीसी देखील बीसीसीआय पुढे एक वेळ खुजी ठरेल. पाकिस्तान क्रिकेट बोर्डचा सर्व खर्च भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून दिल्या जाणाऱ्या फंडातून भागवला जातो, असं खुद्द रमीज राजा यांनी स्पष्ट केलं. ते म्हणाले की, जर बीसीसीआयने आयसीसीला निधी देणं बंद केलं, तर पीसीबी पूर्णपणे उद्ध्वस्त होऊ शकते.
पीसीबीचे नवीन बॉस बनलेल्या रमीज राजा यांनी खुलासा करताना म्हटले आहे की, पाकिस्तान क्रिकेट बोर्डच्या एकूण बजेटमधील ५० टक्के रक्कम ही आयसीसीकडून मिळणाऱ्या अनुदानातून येते, तर आयसीसीला त्यांच्या कमाईचा मोठा हिस्सा म्हणजे जवळपास ९० टक्के महसूल बीसीसीआयकडून मिळतो. अशा परिस्थितीत पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आयसीसीवरील अवलंबित्व कमी करण्याची वेळ आली आहे, असे इस्लामाबादमध्ये आंतर-प्रांतीय बाबींवरील सिनेटच्या स्थायी समितीपुढे ही बाब रमीज राजा यांनी निदर्शनास आणून दिली. रमीज राजा यांच्या वक्तव्याचा हा व्हिडिओ भाजप आय-सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी पोस्ट केला आहे.
या बैठकीत रमीज राजा पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला स्वावलंबी होण्याचे स्वप्न दाखवत होते. व्हायरल व्हिडीओमध्ये रमीज राजा पुढे म्हणाले की, मला भीती वाटते की, जर भारताच्या पंतप्रधानांनी आयसीसीला दिला जाणारा निधी थांबवला, तर पाकिस्तान क्रिकेट बोर्ड कोसळू शकेल. कारण आयसीसीला पाकिस्तानकडून शून्य टक्के निधी मिळतो. संपूर्ण जगाला माहित आहे की, पीसीबीची स्थिती काय आहे. कोणत्याही देशाला पाकिस्तानात जाऊन क्रिकेट खेळायचं नाही. अलीकडेच, न्यूझीलंड आणि इंग्लंडनेही त्यांचा पाकिस्तान दौरा रद्द केला, त्यानंतर पाकिस्तान क्रिकेटला किरकोळ नाही, तर खूप त्रास सहन करावा लागला आहे.
२४ ऑक्टोबरला होणार भारत-पाकिस्तान लढत
टी-२० वर्ल्डकपमध्ये भारत आणि पाकिस्तान एकमेकांविरुद्ध मोहिमेला सुरुवात करतील. हा हाय व्होल्टेज सामना २४ ऑक्टोबर रोजी खेळला जाईल. दोन कट्टर प्रतिस्पर्ध्यांमधील ही लढत दुबईमध्ये रंगणार आहे. पाकिस्तानच्या एका मोठ्या उद्योजकाने वचन दिलं आहे की, जर पाकिस्तान संघाने विश्वचषकात भारताला पराभूत केल्यास त्यांना कोरा चेक देण्यात येईल, असंही राजा यांनी यावेळी सांगितलं.