धोनी बनला दीपक चाहरचा ‘लव्ह गुरु’; गर्लफ्रेंडला प्रपोज करण्याचा बनवला प्लॅन
धोनी दीपक चाहरचा लव्ह गुरू कसा बनला? मैत्रिणीला प्रपोज करण्यासाठी धोनीने चहरला कशी मदत केली. याबद्दल तुमच्या मनाला उत्सुकता लागली असेल. तर झालं असं की, चाहर प्ले-ऑफ सामन्यांनंतर त्याच्या मैत्रिणीला प्रपोज करणार होता, पण जेव्हा त्याने आपला कर्णधार धोनीला याबाबत माहिती दिली, तेव्हा त्याला ही कल्पना आवडली नाही. धोनीने लीग सामने संपल्यानंतर लगेच चाहरला त्याच्या मैत्रिणीला प्रपोज करण्याचा सल्ला दिला.
जागरणमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, दीपक चाहरच्या वडिलांनीही धोनीच्या या प्लॅनचा खुलासा केला आहे. ते म्हणाले की, धोनीच्या सांगण्यावरूनच दीपकने त्याच्या मैत्रिणीला प्ले-ऑफ सामन्याऐवजी लीग सामना संपल्यानंतर प्रपोज केले. १८० देशांनी मुलाचा ऐन्गेजमेंटचा सोहळा पाहिला. आता लवकरच दोन्ही कुटुंबे बसून लग्नाची तारीख निश्चित करतील.’ वडील या नात्याने ते आनंदी दिसत होते.
संघ हरला, पण दीपक जिंकला!
पंजाब किंग्जविरुद्धच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. पंजाबने ४२ चेंडू आणि ६ गडी राखून चेन्नईवर विजय मिळवला. यामुळे चेन्नईच्या रनरेटवर परिणाम झाला आहे. पराभवाच्या या निराशेदरम्यान मैदानावर धोनीच्या संघासाठी काहीतरी चांगले घडत होते, दीपक चाहर आणि त्याच्या मैत्रिणीची सध्या सोशल मीडियात जोरदार चर्चा सुरू आहे.