अमेरिकेचा मोठा निर्णय; सैन्य माघारीनंतर पहिल्यांदाच तालिबानसोबत करणार चर्चा
वॉशिंग्टन: अफगाणिस्तानमधून सैन्य माघारी घेतल्यानंतर अमेरिका आता तालिबानसोबत चर्चा करणार आहे. अमेरिकेच्या सैन्य माघारीनंतर आणि तालिबानने अफगाणिस्तानची सत्ता हाती घेतल्यानंतर ही पहिलीच बैठक असणार आहे. शनिवारी आणि रविवारी दोहामध्ये अमेरिकन शिष्टमंडळ आणि तालिबान नेत्यांमध्ये चर्चा होणार असल्याचे अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. या बैठकीकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.
तालिबानला मान्यता देण्याचा मुद्दा या बैठकीत नसणार असेही अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले. तालिबान सरकारला मान्यता हे त्यांच्या कामाच्या आधारेच दिली जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी म्हटले.
अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याने म्हटले की, अफगाणिस्तानमध्ये सध्या अडकलेल्या अमेरिकन व इतर परदेशी नागरिकांना सुखरूपपणे मायदेशी आणण्यासाठीची योजना तयार करणे हे या बैठकीचा मुख्य मुद्दा आहे. अमेरिकन शिष्टमंडळ या मुद्यावर अधिक भर देणार आहे.