डेव्हिड वॉर्नरची भावनिक पोस्ट होतेय व्हायरल, संघाबाहेर झाल्यावर नेमकं चाहत्यांना काय सांगितलं पाहा…
वॉर्नरने हैदराबादला दिला निरोप
मुंबई इंडियन्सविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात संघाला पराभव पत्करावा लागल्यानंतर डेव्हिड वॉर्नरने सनरायझर्स हैदराबाद संघाला निरोप दिला आहे. वॉर्नर गेल्या अनेक सामन्यांसाठी संघाच्या अंतिम-११ मधून बाहेर होता. आता इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करताना वॉर्नर म्हणाला की, ‘सर्व आठवणींसाठी खूप खूप धन्यवाद. सर्व चाहत्यांचे मनापासून आभार. ज्यांनी आम्हाला नेहमी चांगला खेळ करण्यास आणि शंभर टक्के योगदान देण्यास प्रेरित केले. तुम्ही सर्वांनी संघाला जेवढी साथ दिली आहे, त्यासाठी मी जेवढे आभार मानावे तेवढे कमी पडतील. हा एक चांगला प्रवास होता. मी आणि माझे कुटुंब सर्वांना मिस करेल. चला आज पुन्हा एकदा प्रयत्न करूया.’ या संदेशामधून एक गोष्ट जवळजवळ स्पष्ट झाली आहे की, वॉर्नर पुढील हंगामात हैदराबादकडून खेळणार नाही.
प्रेक्षक म्हणून स्टॅंडमध्ये बसला वॉर्नर
एकेकाळी सनरायझर्स हैदराबादचा स्टार फलंदाज असलेल्या डेव्हिड वॉर्नरबद्दल संघाचेही वर्तन चांगले राहिले नाही. पहिल्यांदा संघाने त्याला कर्णधारपदावरून काढून टाकले आणि आता त्याला डग आउटमध्येही बसायला जागा मिळत नाही. तो अनेक सामन्यांत प्रेक्षकांच्या गॅलरीत बसलेला दिसला आणि तेथून त्याने आपल्या संघाला पाठिंबा दिला. त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले.
वॉर्नरने हैदराबादला जिंकून दिलंय जेतेपद
डेव्हिड वॉर्नरने सनरायझर्स हैदराबाद संघाला एक आयपीएल ट्रॉफीही जिंकून दिली आहे. वॉर्नरच्या नेतृत्वाखाली सनरायझर्स हैदराबादने २०१६ च्या हंगामात रॉयल चॅलेंजर्सला पराभूत करत आयपीएलचे जेतेपद पटकावले. पण यंदाच्या आयपीएल २०२१ मध्ये वॉर्नरची कामगिरी चांगली राहिली नाही. वॉर्नरने या मोसमात ८ सामने खेळले असून त्याने एकूण १९५ धावा केल्या आहेत. त्याच्या नावावर २ अर्धशतकेही आहेत.
उत्कृष्ट रेकॉर्ड
सनरायझर्स हैदराबादचा खराब फॉर्म या मोसमातही कायम आहे. डेव्हिड वॉर्नरने कर्णधारपद सोडल्यानंतरही हैदराबाद विजयी ट्रॅकवर परतले नाही. हैदराबादने या आयपीएल हंगामात फक्त ३ सामने जिंकले आहेत आणि गुणतालिकेत संघ शेवटच्या स्थानावर आहे. वॉर्नरने हैदराबादकडून सातत्याने धावा केल्या आहेत. त्याचे आकडेच सर्वकाही सांगतात.
२०१४ – ५२८ धावा
२०१५ – ५६२ धावा
२०१६ – ८४८ धावा
२०१७ – ६४१ धावा
२०१९ – ६९२ धावा
२०२० – ५४८ धावा
२०२१ – १९५ धावा
तीन वेळा जिंकली ऑरेंज कॅप
वॉर्नरच्या नावावर एक असा विक्रम आहे, ज्याच्या आजूबाजूला कुणीही दिसत नाही. वॉर्नरने ३ वेळा आयपीएलची ऑरेंज कॅप जिंकली आहे. हैदराबादकडून खेळताना त्याने २०१५, २०१७ आणि २०१९ मध्ये आयपीएलची ऑरेंज कॅप जिंकली आहे. असा पराक्रम करणारा तो एकमेव खेळाडू आहे.