डॉ नीलमताई गोऱ्हे यांनी रेल्वे अत्याचार प्रकरणी केली कारवाईची मागणी
पुष्पक एक्सप्रेस मध्ये इगतपुरी ते कसारा दरम्यान धावत्या एक्सप्रेस मध्ये दरोडेखोरांनी केलेल्या महिलांवर अत्याचार व दरोड्याबाबत तात्काळ फरार आरोपींना अटक करून गाडीत कर्तव्यात हलगर्जी केलेल्या पोलीस गार्डवर कडक कारवाई करण्याची विधानपरिषद उपसभापती ना.डॉ.नीलम गोऱ्हे यांची रेल्वे पोलीस प्रशासनास सूचना…

पुणे/नाशिक ,दि १० ऑक्टोबर, २०२१: पुष्पक एक्सप्रेस मध्ये दि ०९ ऑक्टोबर,२०२१ रोजी इगतपुरी ते कसारा दरम्यान ८ दरोडेखोरांनी धावत्या रेल्वेमध्ये दरोडा टाकून एका महिलेवर अत्याचार करून ९६ हजार रुपयांचे मोबाईल व पैसे चोरल्याची घटना नुकतीच घडली आहे. याची गंभीर दखल महाराष्ट्र विधानपरिषद उपसभापती ना.डॉ.नीलम गोऱ्हे यांनी घेतली असून याबाबत रेल्वे पोलीस प्रशासनास पत्र लिहून फरार असलेल्या आरोपींना त्वरित अटक करण्याचे निर्देश दिले आहेत.
रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षतेबाबत डॉ.गोऱ्हे यांनी सातत्याने बैठका घेऊन अनेक उपाय योजना करण्याबाबत रेल्वे पोलीस प्रशासनाला व गृह विभागाला सूचना केल्या आहेत. यामध्ये रेल्वे पोलीस व महाराष्ट्र पोलीस यांची एकत्रीत बैठक दि ०७ ऑक्टोबर,२०२० व ०७ जुलै,२०२१ रोजी घेतली आहे. तसेच रेल्वे प्रवाशांच्या विशेषतः रेल्वे महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी उपाय योजना मा रेल्वे मंत्री, मा.केंद्रीय गृहमंत्री यांनाही निवेदन डॉ.गोऱ्हे यांनी पाठवले होते. त्यातील काही उपाययोजना विविध कारणाने रखडल्या आहेत. यामध्ये गुन्हे घडणाऱ्या ठिकाणी गस्त वाढविणे, CCTV लावणे, महिलांच्या डब्यात अतिरिक्त गस्त वाढविणे, टोल फ्री क्रमांक वरील फोनला तात्काळ उत्तर देऊन आवश्यक कारवाई करणे अशा आहेत. तथापि पुष्पक एक्सप्रेस मधील घटना नक्कीच रेल्वे पोलीस प्रशासनाने अतिरिक्त काळजी घेण्याबाबत उपाय करावेत असे स्पष्ट होते. त्यामुळे या घटनेची गंभीरतेने दाखल घेऊन खालील गोष्टी कराव्यात अशा सूचना डॉ.गोऱ्हे यांनी दिल्या आहेत.
यात ◆ सदर विषयी रेल्वे डब्यामध्ये तैनात रेल्वे पोलीसांची संख्या वाढवण्यात यावी व सदर घटनेच्या वेळी या रेल्वे डब्बामध्ये कर्तव्यावर असण्याऱ्या पोलीसांनी तात्काळ प्रतिबंधक कारवाई का केली नाही? तसेच कर्तव्यास हलगर्जी करणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांची याबाबत चौकशी करून कडक कारवाई करण्यात यावी.
◆सदर पिडीतेला सुयोग्य समुपदेशन,संरक्षण मनोर्धय योजनेतून मदत देऊन तिचे पुर्नवसन करण्यात यावी.
◆ आरोपींना कडक शिक्षा होईल यासाठी तपास अधिकारी यांनी तपास योग्य प्रकारे करण्या संदर्भात स्पष्ट सूचना द्याव्यात.
◆ रात्रीवेळी प्रत्येक डब्यात शस्त्रासह आवश्यक सुरक्षा ठेवावी.
◆ वारंवार घटना घडणाऱ्या ठिकाणी रेल्वे पोलीसांच्या गस्ती वाढविणे आवश्यक आहे.
◆ प्रत्येक डब्यात रात्रीवेळी लाईट सुरू ठेवाव्यात. डब्यातील cctv फुटेज पहावेत, वरील प्रमाणे सूचना सर्व पोलीस प्रशासनास द्याव्यात अशा सूचनांचे पत्र डॉ.गोऱ्हे यांनी दिले आहे.