Lakhimpur Violence: ‘आशिष ऐवजी जर कुणी अतिक असता तर…’, ओवैंसींची सत्ताधाऱ्यांवर टिप्पणी
हायलाइट्स:
- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२२
- असदुद्दीन ओवैसी यांची बलरामपूरमध्ये जाहीर सभा
- ‘पंतप्रधान मोदी आशिषच्या अब्बा जानला आता हटवणार नाहीत?’
उत्तर प्रदेशच्या बलरामपूरमध्ये एका सभेला संबोधित करताना ते बोलत होते. अजय मिश्रा उच्च जातीशी संबंधित आहे. त्यामुळेच त्यांना अद्याप पंतप्रधान मोदींकडून पदावरून हटवण्यात आलेलं नाही, असं असदुद्दीन ओवैसी यांनी म्हटलंय. ‘पंतप्रधान मोदी आशिषच्या अब्बा जानला आता हटवणार नाहीत?’ असा प्रश्न ओवैसी यांनी यावेळी विचारला.
भाजपनं आता आपलं निवडणूक चिन्ह बदलून थार जीप चिन्हाचा स्वीकार करायला हवा, अशी टिप्पणीही ओवैसी यांनी यावेळी केली. मुख्य आरोपी आणि केंद्रीय मंत्रीपुत्र आशिष मिश्रा टेनी यानं आपल्या थार महिंद्रा गाडीखाली शेतकऱ्यांना चिरडल्याचा आरोप प्रत्यक्षदर्शींनी केला आहे. ३ ऑक्टोबर रोजी लखीमपूर खीरीमध्ये घडलेल्या या घटनेनंतर तब्बल सहाव्या दिवशी म्हणजेच ९ ऑक्टोबर रोजी दोन नोटिशीनंतर आशिष पोलिसांसमोर चौकशीसाठी हजर झाला होता. तब्बल १२ तासांच्या चौकशीनंतर त्याला अटक करण्यात आली होती. आशिषकडून पोलिसांना तपासात सहकार्य करण्यात आलं नसल्याचं पोलिसांनी सांगितलं होतं.
‘मोदी आशिषच्या अब्बा जानला हटवणार नाहीत का? अब्बा जानच्या मुलाविरोधात आता बाबा (योगी आदित्यनाथ) काही कारवाई करणार का? पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अजय मिश्रा यांना हटवलेलं नाही, कारण ते उच्च जातीशी संबंधित आहेत. आशिष ऐवजी जर अतिक असता तर आतापर्यंत बाबाजींनी त्याच्या घरावर बुलडोझर फिरवला असता. योगी बाबांच्या बुलडोझरवर केवळ मुस्लिमांची घरं तोडली जातील, असं लिहिलंय का?’ असं बलरामपूरमध्ये ओवैसी यांनी म्हटलं.