कोळसाटंचाईचे संकट, पण कोयना प्रकल्पामुळे महाराष्ट्र प्रकाशात
देशभरात निर्माण झालेल्या कोळसाटंचाईचा वीजनिर्मितीस फटका बसत आहे. तसाच फटका महानिर्मितीच्या वीज उत्पादनालादेखील बसला आहे. महानिर्मितीचे औष्णिक वीज उत्पादन सरासरीपेक्षा ३० टक्के तर, स्थापित क्षमतेच्या निम्म्यापर्यंत घटले आहे. कोळसासंकट येण्याआधीपर्यंत सप्टेंबरमध्ये महानिर्मितीने ६८०० मेगावॉटचे विक्रमी उत्पादन केले होते. परंतु आता कोळसाटंचाई असल्याने हे उत्पादन ४८०० मेगावॉटपर्यंत घसरले आहे. या स्थितीत कोयना जलाशयाने महानिर्मितीला मोठी मदत केली आहे.
कोळसासंकट येण्याआधी कोयना जलविद्युत प्रकल्पातून सरासरी ६५० मेगावॉटपर्यंत उत्पादन होत होते. ते आता १२०० ते १३०० मेगावॉटवर नेण्यात आले आहे. त्याचवेळी घाटघर जलविद्युत प्रकल्पातूनदेखील २४५ मेगावॉट वीजनिर्मिती सुरू करण्यात आली आहे. महानिर्मितीकडून सद्यस्थितीत तब्बल १६९३ मेगावॉट जलविद्युत निर्मिती होत आहे. ‘यंदा कोयनासह अन्य सर्वच धरणक्षेत्रांत दमदार पाऊस पडला आहे. त्यामुळे जलाशय भरले आहेत. अद्यापही पाऊस सुरूच आहे. तसेच जलविद्युत संचांची क्षमता वाढवणे तुलनेने सोपे असते. त्याला औष्णिक प्रकल्पांइतका वेळ लागत नाही. त्यामुळेच जलविद्युत प्रकल्पांची क्षमता वाढविण्यात आली आहे,’ असे सूत्रांनी सांगितले.
लवकरच सुरळीत
महानिर्मितीचे २७ पैकी सहा संच सध्या कोळशाअभावी बंद आहेत. महानिर्मितीच्या विविध विद्युत प्रकल्पांमध्ये मिळून रविवारी १.८२ लाख मेट्रिक टन कोळसा साठा शिल्लक होता. कोळसा पुरवठा लवकरच सुरळीत होईल, असा विश्वास ऊर्जा मंत्रालयाने व्यक्त केला आहे.