अजूनही मुख्यमंत्री असल्यासारखं वाटतंय; फडणवीसांच्या वक्तव्यावर काँग्रेस म्हणते…
काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे (Atul Londhe) यांनी या संदर्भात एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्या माध्यमातून त्यांनी फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. ‘देवेंद्र फडणवीस स्वप्नातून बाहेर यायला तयारच नाहीत. ते आता मुख्यमंत्री नाहीत, विरोधी पक्ष नेते आहेत, हे मान्य करायलाच तयार नाहीत. त्यांचा पहाटेचा प्रयोगही फसलेला आहे. महाविकास आघाडीचं (Maha Vikas Aghadi) सरकार पाडण्याच्या अनेक तारखा ज्योतिषांकडून घेऊनही त्यांना ना झेंडा फडकवता आलाय, ना पुन्हा शपथ घेता आलीय. तरीही साहेबांचं ‘मी पुन्हा येईन… मी पुन्हा येईन…’ हे सुरूच आहे. मीच मुख्यमंत्री आहे, असं आताही त्यांना वाटतंय. पाच वर्षे मुख्यमंत्री राहिलेल्या व्यक्तीसाठी हे किती हास्यास्पद आहे,’ असं लोंढे यांनी म्हटलं आहे.
काय म्हणाले होते फडणवीस?
‘गेले दोन वर्ष सातत्यानं राज्यभर फिरतोय. लोकांशी बोलतोय. लोकांचं प्रेम अजिबात कमी झालेलं नाही. माणूस कोणत्या पदावर आहे ते महत्त्वाचं नाही. तो काय काम करतो हे जास्त महत्त्वाचं आहे. मला जनतेनं कधी मी मुख्यमंत्री नसल्याचं जाणवू दिलं नाही. त्यामुळं मी आजही मुख्यमंत्री आहे असंच मला वाटतं. विरोधी पक्षनेता म्हणून मी उत्तम करतोय. ज्या दिवशी जनतेचा आशीर्वाद मिळेल, त्या दिवशी पुन्हा इथं देवीचा आशीर्वाद घेण्यासाठी येईन,’ असंं फडणवीस म्हणाले होते.
वाचा: अंबरनाथ MIDC मध्ये वायूगळती; श्वास घेणंही झालं अवघड, प्रचंड घबराट