महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी आधुनिक महिला धोरण करण्याची शिफारस – विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे
जागतिक महिला दिन ८ मार्च २३ ला विधीमंडळात जागतिक महिला आयोगाच्या ६७व्या सत्राच्या व नवीन महिला धोरणाबाबत प्रस्ताव ही नीलम गोर्हे यांच्या सुचनेची स्विकृती
विधान परिषदेच्या कामकाजामध्ये येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विशेष उल्लेख आणि इतर आयुधांचा प्रभावी वापर व्हावा, अशी महत्त्वपूर्ण सूचना
मुंबई, ता. ८ : महिला धोरण सन १९९४, २००२, २०१४ तसेच २०१९ चे प्रस्तावित धोरण व २००१ चे राष्ट्रीय महिला धोरण यांचे एकत्रीकरण करून महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी आधुनिक महिला धोरण करण्याची शिफारस आज विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केली .

हा ठराव कामकाज सल्लागार समितीने आज मान्य केल्यानंतर येत्या महिला दिनी म्हणजेच दिनांक ०८ मार्च, २०२३ रोजीच्या विधानपरिषद व विधानसभा या दोन्ही सभागृहात घेण्यात यावा असा विषय आजच्या कामकाज सल्लागार समितीत मांडला. महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी व महिलांना सर्व क्षेत्रात समान तसेच सन्मानाचे स्थान मिळावे. या अनुषंगाने संयुक्त राष्ट्रसंघ पुरस्कृत जागतिक महिला आयोगाचे ६७ वे सत्र मार्च, २०२३ मध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने ६ मार्च ते १७ मार्च या दरम्यान आयोजित करण्यात आले आहे. या अधिवेशनातील निर्धारित निर्णयात भारत सरकारचाही कायम सहभाग असतो.आम्ही आरोग्य विषयक सुविधा,सुरक्षितता, आर्थिक, सामाजिक व राजकीय सक्षमीकरण यासाठी महिलांच्या हितासाठीचे कायदे व त्याची अंमलबजावणीची यंत्रणा उभारण्यासाठी वचनबद्ध आहोत हे या निमित्ताने राज्य शासनाच्यावतीने अधोरेखित केले आहे.’
सदर प्रस्तावातील मसुदा अशा स्वरूपाचा आहे. त्याचे अंतिम स्वरूप लवकरच निश्चित करण्यात येईल.
येत्या २७ फेब्रुवारी पासून सुरू होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये कामकाजामध्ये लक्षवेधी सूचना, विशेष उल्लेख यांनाही पुरेसा कालावधी मिळावा. अधिवेशन काळ अधिकाधिक कामासाठी वापरला जावा, विशेष म्हणजे २७ फेब्रुवारी २०२३ रोजी मराठी भाषा दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन दुपारी विधान भवनातील मध्यवर्ती सभागृहात करण्यात आले आहे.
या कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित राहावे, अशी सूचना आज विधान परिषद उपसभापती ना. डॉ. गोऱ्हे यांनी केली.
विधान भवन मुंबई येथे आज झालेल्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीमध्ये त्या बोलत होत्या.
या बैठकीमध्ये अधिकाधिक दिवस कामकाज चालावे अशी सूचना आ. एकनाथ खडसे यांनी केली. त्याचबरोबर या कामकाजाच्या माध्यमातून अधिकाधिक काम व्हावे, अशीही अपेक्षा सर्वांनी व्यक्त केली. यावर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर सकारात्मकता दर्शविली आहे.