भक्ती प्रवाह – तुका म्हणे
भक्ती प्रवाह
तुका म्हणे –
बीज जाळुनि केली लाही ।
आम्हा जन्ममरण नाही ।।१।।
आकारासि कैचा ठाव ।
देह प्रत्यक्ष झाला देव ।।२।।
साकरेचा नोहे ऊस ।
आम्हा कैचा गर्भवास ।।३।।
तुका म्हणे अवघा जोग ।
सर्वांघटी पांडूरंग ।।४।।
अर्थ –
आम्ही चित्तातील वासनांच्या बीजांची जाळून लाही केली आहे. त्यामुळे आमचे जन्ममरण चुकले आहे. ।।१।।
आमच्यासाठी आकाररूपी विकार संपले आहेत. कारण आमचा देह प्रत्यक्ष देवस्वरूप बनला आहे. ।।२।।
ऊसापासून साखर बनवली की जसा पुन्हा तिचा ऊस बनत नाही त्याप्रमाणे आमच्या मनातील वासना जळून गेल्याने आम्हाला पुन्हा गर्भवास भोगावा लागणार नाही. ।।३।।
तुकोबा म्हणतात, सर्वाठायी पांडूरंगाला पाहणे हाच आमचा योग आहे. ।।४।।