मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा वडिलकीचा आधार आणि त्यांनी दिलेली प्रेरणा माझ्यासाठी मोलाची – भाग्यश्री पटवर्धन
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा वडिलकीचा आधार आणि त्यांनी दिलेली प्रेरणा माझ्यासाठी मोलाची – भाग्यश्री पटवर्धन support of Chief Minister Uddhav Thackerays elders and inspiration he gave is valuable to me – Bhagyashree Patwardhan
मुंबई,दि ८ – सध्याच्या अडचणीच्या काळात मनावर नैराश्य न येऊ देता आपल्या वारली चित्रातून घराच्या कंपाऊंड वॉलवर रामायणातील घटना प्रसंग साकारणाऱ्या अमरावतीच्या भाग्यश्री विनायक पटवर्धन हिच्याशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फोनवरून संवाद साधला आणि तिचे अभिनंदन केले.
यावेळी बोलतांना रामायणाप्रमाणेच विविध भारतीय सणांचे चैतन्य आणि दिव्यत्व तुझ्या वारली चित्राच्या माध्यमातून चित्रित कर, त्याचे एक चांगले पुस्तक प्रकाशित करता येऊ शकेल असेही मुख्यमंत्री भाग्यश्रीला म्हणाले.
आपल्या चित्रकलेची दखल घेऊन स्वत: राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आपल्याला फोन केल्याचा आनंद भाग्यश्रीच्या शब्दात मावत नव्हता. ती म्हणाली, आपले मुख्यमंत्री स्वत: उत्तम फोटोग्राफर आहेत हे माहित होते, त्यांनी काढलेले गड किल्ल्यांचे आणि वन्यजीवांचे फोटो मी स्वत: ही पाहिलेले आहेत. त्यांचे कलेवरचे प्रेम ही मला माहित आहे पण ते माझ्यासारख्या सामान्य कलाकाराला स्वत:हून फोन करतील, माझं अभिनंदन करतील असं कधीच वाटलं नव्हते.
मुख्यमंत्र्यांनी तिला भारतीय सण समारंभाची माहिती देणारे वारली चित्रे काढ, त्याचे उत्तम दर्जाचे फोटो घे, ते पुस्तकाच्या माध्यमातून लोकांसमोर आणता येईल असे म्हणून तिच्या कलेला प्रोत्साहन तर दिलेच परंतू या करोनाच्या अडचणीच्या काळात विनाकारण घराबाहेर पडू नको, स्वत:ची, कुटुंबियांची काळजी घे असेही ते म्हणाले. त्यांचा वडिलकीचा आधार आणि त्यांनी दिलेली प्रेरणा माझ्यासाठी खुप मोलाची आहे,असेही भाग्यश्रीने म्हटले आहे.
भाग्यश्री कोरोना काळाआधी पुण्यात ट्रॅव्हल फोटोग्राफी आणि इलेस्ट्रेशन आर्टिटस्ट म्हणून काम करत होती. करोनाच्या प्रादुर्भावानंतर ती अमरावतीला घरी परतली. मी स्वत: निस्सीम रामभक्त आहे, लहानपणापासून रामायण ऐकत, वाचत आणि पहात आले आहे त्यामुळे मला रामायणातील सगळे घटनाप्रसंग, त्यातील बारकावे माहित होते. टाळेबंदीच्या काळात मनाला शांती मिळण्यासाठी मी घराच्या कंपाऊंडवॉलवर श्रीरामाच्या जन्मापासून रावणाच्या वधापर्यंतचे प्रमुख घटनाप्रसंग वारली चित्राच्या माध्यमातून रेखाटले. त्यातून वेळ सत्कारणी तर लागलाच पण मनाला शांती ही मिळाली. श्रीराम जन्म, सीता स्वंयवर,वनवास,सीता हरण,जटायुचे रावणा सोबतचे युद्ध, रामसेतूची बांधणी, राम रावण युद्ध असे विविध प्रसंग भाग्यश्रीने आपल्या वारली कलाकृतीतून साकारले आहेत.