आव्हाडांच्या अटक आणि सुटकेनंतर भाजप आक्रमक; मंत्रिमंडळातून हकालपट्टीची मागणी


मुंबई : अनंत करमुसे या तरुणाला झालेल्या मारहाण प्रकरणात राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना ठाणे पोलिसांकडून अटक करण्यात आली. तसंच काही वेळानंतर जामिनावर त्यांची सुटकाही करण्यात आली. मात्र या घटनेवरून आता भाजपने आक्रमक भूमिका घेतली असून आव्हाड यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

‘अखेर ठाकरे सरकारचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांना अनंत करमुसे अपहरण आणि मारहाण प्रकरणी अटक झाली. या पार्श्वभूमीवर जितेंद्र आव्हाड यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्यात यावी,’ अशी मागणी ट्वीटद्वारे भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी केली आहे.

‘तब्बल १५ महिन्यांनंतर अनंत करमुसे या तरुणाला न्याय मिळाला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणात काही कारवाई केलीच नाही. त्यामुळे अखेर करमुसे याला कोर्टात जाऊन न्याय मिळवावा लागला. आता आव्हाड यांची उद्याच मंत्रिमंडळातून हकालपट्टी झाली पाहिजे,’ असं सोमय्या म्हणाले.

दरम्यान, या प्रकरणावरून भाजप नेते आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीही जितेंद्र आव्हाड आणि ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. त्यामुळे पुढील काळात या मुद्द्यावरून भाजपकडून ठाकरे सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला जाण्याची शक्यता आहे.

नेमकं काय आहे प्रकरण?

घोडबंदर भागात राहणाऱ्या अनंत करमुसे या तरुणाने मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याविषयी आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट केली होती. या पोस्टनंतर घरी आलेल्या पोलिसांकडून करमुसे यांना आव्हाड यांच्या ठाण्यातील बंगल्यावर नेण्यात आले आणि तेथे त्यांना १५ ते २० जणांनी बेदम मारहाण केल्याचा आरोप आहे. या मारहाणीच्या वेळी आव्हाड देखील बंगल्यात उपस्थित असल्याचं करमुसे यांनी आपल्या तक्रारीत म्हटलं होतं. मागील वर्षी ५ एप्रिल रोजी घडलेल्या या घटनेप्रकरणी वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: