जीडीपीच्या ६ टक्के खर्च शिक्षणावर करावा : शां.ब. मुजुमदार
शां.ब.मुजुमदार, खासदार गिरीश बापट यांच्या हस्ते खडकीत वैदेही दत्ताजी गायकवाड कनिष्ठ महाविद्यालयाचे भूमिपूजन
पुणे,ता.१७ : या देशात शिक्षणाकडे दुर्लक्ष झाले. ज्या देशात शिक्षण व आरोग्यसेवा उत्तम मिळते, तो देश विकसित समजला जातो. आपल्या देशात शिक्षणावर एकूण जीडीपीच्या अधिकाधिक ३.५ टक्के खर्च होतो. तो खर्च ६ टक्केपर्यंत करणे गरजेचे आहे, असे मत सिम्बॉयोसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष शां.ब. मुजुमदार यांनी व्यक्त केले.
खडकी शिक्षण संस्थेअंतर्गत वैदेही दत्ताजी गायकवाड यांच्या नावाने इंग्रजी माध्यमातील कनिष्ठ महाविद्यालय उभारण्यात येत आहे. त्याच्या नवीन इमारतीच्या बांधकामाचे भूमीपूजन आज (ता.१७) मुजुमदार आणि खासदार गिरीश बापट यांच्या हस्ते झाले. या वेळी खडकी छावणी परिषदेचे उपाध्यक्ष दुर्योधन भापकर, ताराचंद रुग्णालयाच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष दत्ताजी गायकवाड, वैदेही गायकवाड, खडकी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल, मानद अध्यक्ष ऍड. एस. के. जैन, उपाध्यक्ष अनिल मेहता, सचिव आनंद छाजेड, सहसचिव शिरीष नाईकरे आदी उपस्थित होते. हा कार्यक्रम निवडक पाहुण्यांच्या उपस्थितीत झाला.
दत्ताजी गायकवाड म्हणाले,” खेडेगावात जन्माला आलो, तिथेच वाढलो. शिक्षण घ्यायला पैसे नसलेल्या मुलांना वडील पैसे द्यायचे.काही काळ पुण्यात नोकरी केली. नंतर उद्योगात आलो. उद्योग विस्तारला. मला शिक्षण पूर्ण करता आले नाही म्हणून मुलाने ते पूर्ण करावे, अशी इच्छा होती.मात्र तो हे अकाली सोडून गेला.पत्नी वैदेही खंबिरपणे पाठीशी उभी राहिली म्हणून मुलाच्या नावे शाळा बांधल्यानंतर आता वैदेहीच्या नावाने हे कनिष्ठ महाविद्यालय बांधीत आहे.आर्थिक दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी सवलत देण्यात येईल. नवीन इमारतीचे बांधकाम लवकरच पूर्ण करून पुढील शैक्षणिक वर्षात महाविद्यालय सुरु करण्यात येईल.दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात डायलिसीस सेंटर सुरू केले आहे. ताराचंद रुग्णालयाच्या माध्यमातून गरजू रुग्णांना मदत करण्यात येत आहे. महाबळेश्वर, बावधन, कर्वे रस्ता येथेही विविध शैक्षणिक संस्थांना इमारती बांधून दिल्या आहेत. चांदेगाव (ता.राहुरी, जि. नगर) येथील २० एकर जमीन पुणे विद्यार्थी गृहाला शैक्षणिक कार्यासाठी दिली आहे. ग्रामीण भागातून पुण्यात स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी येणाऱ्या गरीब मुलींची राहण्याची सोय करण्या साठी भविष्यात मुलींचे वसतिगृह काढण्याचा विचार आहे.पर्यावरण संवर्धनासाठी पुणे शहरात सरकारी रुग्णालये, शिक्षण संस्था, प्रभात रस्ता आदी ठिकाणी ५००० वृक्षांचे रोपण करण्यात आले आहे, अशी माहिती गायकवाड यांनी दिली.
पुण्याचे खासदार गिरीश बापट म्हणाले,उद्योजक गायकवाड यांचे कार्य अत्यंत मौल्यवान आहे. समाजात माणुसकी वाढावी यासाठी मोलाचे योगदान देणाऱ्या माणसांत गायकवाड कुटुंबीय प्रथम स्थानी आहेत. देश, समाज, धर्म सांभाळून समाजसेवा करण्यात त्यांचा मोठा वाटा आहे .
या वेळी दुर्योधन भापकर, एस.के.जैन आणि कृष्णकुमार गोयल यांनी मनोगत व्यक्त केले.