Video: टी-२० वर्ल्डकपमध्ये इतिहास घडला; आजवर कोणालाही जमला नाही हा विक्रम


दुबई: युएई आणि ओमान येथे आयसीसी टी-२० वर्ल्डकपला सुरूवात झाली आहे. मुख्य स्पर्धेला सुरुवात होण्यास अद्याप वेळ आहे. त्याआधीच पात्रता फेरीत एका पेक्षा एक शानदार खेळी पाहायला मिळत आहे. पात्रता फेरीतील दुसऱ्या दिवशी टी-२० वर्ल्डकपच्या इतिहासात आजवर कोणाला न जमलेला एक विक्रम झालाय.

पहिल्या दिवशी स्कॉटलंडने बांगलादेशला पराभवाचा धक्का दिला. तर दुसऱ्या दिवशी आयर्लंड आणि नेदरलँड यांच्यात असा एक विक्रम झाला जो गेल्या १४ वर्षाच्या इतिहासात झाला नाही. आयर्लंडच्या कर्टिस कॅम्फरने फक्त हॅटट्रिक केली नाही तर सलग चार चेंडूत चार विकेट घेतल्या.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना नेदरलँड्सने नवव्या षटकाअखेर २ बाद ५० धावा केल्या होत्या. मात्र, दहावे षटक संस्मरणीय ठरले. या षटकातील दुसऱ्या चेंडूवर कर्टिस कॅम्फरने कॉलिन अॅकरमनला यष्टिरक्षक रॉककरवी झेलबाद केले. त्यापाठोपाठ त्याने रायन टेन डूशाट, स्कॉट एडवर्ड्स यांना पायचीत पकडले, तर रॉल्फचा त्रिफळा उध्वस्त केला. त्यानंतर, सलामीवीर मॅक्स ओडाउडच्या अर्धशतकामुळे नेदरलँड्सने आयर्लंडसमोर १०७ धावांचे लक्ष्य ठेवले. हे लक्ष्य आयर्लंडने सोळाव्या षटकात तीन विकेटच्या मोबदल्यात पार केले. यात गॅरेथ डेलनी २९ चेंडूंत पाच चौकार आणि दोन षटकारांसह ४४ धावांची, तर पॉल स्टर्लिंगने ३९ चेंडूंत एक चौकार आणि एका षटकारासह नाबाद ३० धावांची खेळी केली.

कॅम्फरच्या या विक्रमाआधी टी-२० वर्ल्डकपमध्ये हॅटट्रिक झाली होती. पण चार चेंडूवर चार विकेट घेण्याची कामगिरी प्रथमच घडली आहे. टी-२० प्रकारात याआधी राशिद खान आणि लसिथ मलिंगा यांनी सलग चार विकेट घेण्याची कामगिरी केली आहे. राशिद खानने २०१९ साली आयर्लंड विरुद्ध तर मलिंगाने न्यूझीलंडविरुद्ध त्याच वर्षी अशी कामगिरी केली होती. टी-२० मध्ये दोन वेळा हॅटट्रिक घेणारा तो एकमेव गोलंदाज आहे.

कॅम्फरने केलेली हॅटट्रिक टी-२० वर्ल्डकपमधील फक्त दुसरी हॅटट्रिक ठरली आहे. याआधी अशी कामगिरी फक्त ऑस्ट्रेलियाच्या ब्रेट लीने केली होती. आता कॅम्फरने ब्रेटलीला मागे टाकत चार चेंडूत चार विकेट घेतल्या आहेत.


– टी-२० वर्ल्ड कपमध्ये सलग चार चेंडूंवर विकेट मिळवणारा कॅम्फर पहिलाच गोलंदाज ठरला. त्याने कॉलिन अॅकरमन, रायन टेन डुशाट, स्कॉट एडवर्ड्स आणि रोल्फ वॅन डर मर्व्ह यांना दहाव्या षटकातील दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या चेंडूवर बाद केले.

– आंतरराष्ट्रीय टी-२०मध्ये सलग चार चेंडूंवर चार विकेट घेणारा कर्टिस कॅम्फर तिसराच गोलंदाज ठरला. यापूर्वी, २०१९मध्ये अफगाणिस्तानच्या रशीद खानने आयर्लंडविरुद्ध, तर २०१९मध्ये श्रीलंकेच्या लसिथ मलिंगाने न्यूझीलंडविरुद्ध अशी कामगिरी केली होती.

– टी-२० वर्ल्ड कपमध्ये हॅट्‌‌ट्रिक नोंदवणारा कॅम्फर दुसराच गोलंदाज ठरला. यापूर्वी, २००७च्या टी-२० वर्ल्ड कपमध्ये ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज ब्रेट ली याने बांगलादेशविरुद्ध हॅट्‌‌ट्रिक घेतली होती.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: