भक्ती प्रवाह -तुका म्हणे

   भक्ती प्रवाह 

      तुका म्हणे - 

वोणव्या सोकरी ।
सेत खादले पाखरी ।।१।।

तैसा खाऊ नको दगा ।
निदसुरा राहुनी जागा ।।२।।

चोरासवे वाट ।
चालोनि केले तळपट ।।३।।

डोळे झाकुनी राती ।
कूपी पडे दिवसा जोती ।।४।।

पोसी वांझ गाय ।
तेथे कैची दूध साय ।।५।।

फुटकी सांगडी ।
तुका म्हणे न पवे थडी ।।६।।

अर्थ –

शेतात खाली मान घालून वाकून बसलेल्या शेतकऱ्याचे सगळे पीक पाखरांनी खाऊन न्यावे त्याप्रमाणे ।।१।।

हे माणसा ! तू संसाररुपी शेतात खाली मान घालून गाफील राहू नकोस.नाहीतर इंद्रियरुपी पाखरांकडून दगा खाशील. तू व्यवस्थित जागा रहा आणि पीकाचे रक्षण कर. ।।२।।

इतके दिवस तू ह्या विषयरुपी चोरांसोबत वाट चालून पायाची तळपटे सोलण्याचे सोडून दुसरे काय बरे केलेस ? ।।३।।

तू अविद्येच्या रात्रीमध्ये विवेकाचे डोळे बंद करून वावरतोस आणि पतनाच्या खड्ड्यात पडतोस. मग विद्येच्या भरदिवसा हातात दिवा घेऊन फिरतोस.।।४।।

तू ही इंद्रियरुपी वांझ गाय इतके दिवस पोसलीस त्यातून तुला दूध आणि साय कधीतरी मिळाली का ? (इंद्रियांचे लाड पुरवूनही त्यातून शाश्वत सुख कधीच मिळत नाही.) ।।५।।

तुकोबा म्हणतात, फुटलेली नाव पैलतीरावर कधीच पोहचवत नसते. (म्हणून जे अशाश्वत आहे त्याच्या मागे धावणे सोडून शाश्वताची इच्छा ठेव आणि शहाणा हो.) ।।६।।

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: