गीता गोपीनाथ IMFच्या मुख्य अर्थतज्ज्ञ पदाचा देणार राजीनामा; काय आहे कारण?


नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (आयएमएफ) मुख्य अर्थतज्ज्ञ गीता गोपीनाथ जानेवारीमध्ये राजीनामा देणार आहेत. भारतीय-अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ गीता जानेवारी २०१९ मध्ये आयएमएफशी जोडल्या गेल्या होत्या. आयएमएफला निरोप दिल्यानंतर त्या पुन्हा जगप्रसिद्ध हार्वर्ड विद्यापीठात परतणार आहेत. आयएमएफने मंगळवारी (१९ ऑक्टोबर) एका निवेदनात ही माहिती दिली.

आयएमएफमध्ये सामील होण्यापूर्वी ४९ वर्षीय गीता गोपीनाथ या हार्वर्ड विद्यापीठात आंतरराष्ट्रीय अभ्यास आणि अर्थशास्त्राच्या प्राध्यापक म्हणून कार्यरत होत्या. हार्वर्ड विद्यापीठाने गोपीनाथ यांच्या अनुपस्थितीची रजा एक वर्ष वाढवून त्यांना तीन वर्षांसाठी आयएमएफमध्ये सेवा करण्याची परवानगी दिली होती. म्हैसूरमध्ये जन्मलेल्या गीता या आयएमएफच्या पहिल्या महिला मुख्य अर्थतज्ज्ञ आहेत. अलीकडेच अमेरिकेच्या कार्नेगी कॉर्पोरेशनने (Carnegie Corporation) गीता यांचा सन्मान केला. अमेरिकन समाज आणि लोकशाही समृद्ध तसेच बळकट करण्याच्या योगदानासाठी त्यांना सन्मानित करण्यात आले होते.

आयएमएफने काय म्हटले आहे?
आयएमएफच्या व्यवस्थापकीय संचालक क्रिस्टलिना जॉर्जिएवा यांनी सांगितले की, गीता यांच्या उत्तराधिकारीचा शोध लवकरच सुरू केला जाईल. गीता या आयएमएफच्या संशोधन विभागाच्या प्रमुख आहेत. हा विभाग जीडीपी वाढीच्या अंदाजासह त्रैमासिक जागतिक आर्थिक दृष्टीकोन अहवाल तयार करतो. कोरोनाच्या काळात गीता यांनी कौतुकास्पद काम केले. जॉर्जिएवा यांनी निवेदनात म्हटले आहे की, गीता यांचे योगदान खरोखर उल्लेखनीय आहे. आंतरराष्ट्रीय वित्त आणि मॅक्रोइकॉनॉमिक्स या विषयात त्यांच्या सखोल आकलनाचा आम्हाला खूप फायदा झाला.

भारताशी नाते
गीता गोपीनाथ सध्या अमेरिकेच्या रहिवासी आहेत, पण त्यांचे भारताशी घनिष्ट नाते आहे. त्यांचा जन्म भारतात झाला असून त्यांनी १९९२ मध्ये लेडी श्रीराम कॉलेज, दिल्ली विद्यापीठातून अर्थशास्त्रात पदवीचे शिक्षण घेतले. आणि नंतर दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून अर्थशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. १९९४ मध्ये त्या वॉशिंग्टन विद्यापीठात गेल्या. १९९६ ते २००१ पर्यंत त्यांनी प्रिन्स्टन विद्यापीठातून अर्थशास्त्रात पी.एचडी. केली.

गीता गोपीनाथ २००१ ते २००५ पर्यंत शिकागो विद्यापीठात सहाय्यक प्राध्यापक होत्या, त्यानंतर त्यांनी हार्वर्ड विद्यापीठात सहाय्यक प्राध्यापक म्हणून प्रवेश घेतला. पुढील पाच वर्षांत म्हणजे २०१० मध्ये त्याच विद्यापीठात प्राध्यापक म्हणून रुजू झाल्या. त्यांनी व्यापार आणि गुंतवणूक, आंतरराष्ट्रीय आर्थिक संकट, आर्थिक धोरणे, कर्ज आणि उदयोन्मुख बाजाराच्या समस्यांवर सुमारे ४० शोधनिबंध लिहिले आहेत.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: