सततच्या आरोपांविरोधात समीर वानखेडेंनी उचललं ‘हे’ पाऊल, NCB चीही साथ


हायलाइट्स:

  • समीर वानखेडे यांच्यावर आरोप सुरूच
  • वानखेडे यांनी कोर्टात सादर केलं प्रतिज्ञापत्र
  • ड्रग्ज प्रकरणाचा तपास भरकटवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप

मुंबई: एनसीबीच्या काही छाप्यांच्या प्रकरणात पंच म्हणून नोंद असलेला फरार आरोपी किरण गोसावी (Kiran Gosawi) याचा बॉडीगार्ड प्रभाकर साईल यानं समीर वानखेडे यांच्यावर खंडणीखोरीचा आरोप केला आहे. साईल याचा आरोप करतानाचा व्हिडिओ काल सोशल मीडियात व्हायरल झाला होता. त्यामुळं प्रचंड खळबळ उडाली होती. त्यानंतर एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी कोर्टात प्रतिज्ञापत्र दाखल केलं आहे. (Sameer Wankhede Files Affidavit in Court)

आर्यन खानच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार असतानाच प्रभाकर साईल याचं कथित प्रतिज्ञापत्र समोर आलं आहे. त्यातून त्यांनी वानखेडे यांच्यावर खंडणी मागितल्याचा आरोप केला आहे. या पार्श्वभूमीवर वानखेडे यांनी कोर्टात प्रतिज्ञापत्र सादर केलं आहे. क्रूझ ड्रग्ज प्रकरणात कोर्टाबाहेर होत असलेले आरोप, उघड केली जात असलेली पंच, साक्षीदारांची नावं यास वानखेडे यांनी हरकत घेतली आहे. घडलेला गुन्हा आणि त्याविषयीच्या पुराव्यांबाबत कोर्टाबाहेर सोशल मीडियामध्ये उलटसुलट चर्चा होत आहे. त्यामुळं तपास आणि खटल्यावर परिणाम होऊ नये, अशी अपेक्षा प्रतिज्ञापत्रात व्यक्त करण्यात आली आहे. ‘तपासात खोडा घालण्यासाठी मला धमक्या दिल्या जात आहेत. समीर खान नामक एका व्यक्तीला ड्रग्ज प्रकरणात अटक केल्यापासून एक राजकीय नेता मला सातत्यानं लक्ष्य करत आहे. माझ्या कुटुंबीयांवर खोटे आरोप करून त्यांची बदनामी केली जात आहे. न्यायालयानं याची दखल घ्यावी,’ अशी विनंती समीर वानखेडे यांनी प्रतिज्ञापत्रातून केली आहे.

वाचा: माझ्या वडिलांचं नाव दाऊद नाही, ज्ञानदेव आहे; समीर वानखेडे संतापले

वानखेडे यांच्या प्रतिज्ञापत्राबरोबरच एनसीबीनंही अर्ज दाखल केला आहे. ‘प्रभाकर साईल याच्या कथित प्रतिज्ञापत्राद्वारे कोर्टाला पूर्वग्रहयुक्त करण्याचा प्रयत्न केला जात आहे. हे प्रतिज्ञापत्र कोर्टात अधिकृतरित्या सादर न करता माध्यमे आणि समाजमाध्यमांमध्ये व्हायरल करण्यात आलं. यातून कुहेतू स्पष्ट होतो. यामागे हितसंबंध गुंतलेले लोक आहेत. शिवाय समीर वानखेडे यांना व्यक्तिशः लक्ष्य केले जात असून तपासावर परिणाम व्हावा हा उद्देश त्यामागे आहे. त्यामुळं त्या कथित प्रतिज्ञापत्राची कोणत्याही कोर्टात दखल घेतली जाऊ नये या दृष्टीनं आदेश द्यावेत’, अशी विनंती एनसीबीनं अर्जात केली आहे. या अर्जावर आजच आदेश दिले जाण्याची शक्यता आहे.

वाचा: समीर दाऊद वानखेडे… नवाब मलिक यांचा आणखी एक खळबळजनक आरोपSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: