‘फडणवीसांना खंडणीखोराची वकिली करावी लागतेय, त्यांची ही अवस्था बघवत नाही’


हायलाइट्स:

  • संजय राऊत यांनी डागली फडणवीसांवर तोफ
  • देवेंद्र फडणवीस खंडणीखोरांची वकिली करताहेत – राऊत
  • महाराष्ट्राला बदनाम करण्याचा केंद्र सरकारचा कट – राऊत

मुंबई: क्रूझ ड्रग्ज पार्टीवरील कारवाईपासून वादाच्या भोवऱ्यात अडकलेले व अनेक आरोप होत असलेले एनसीबीचे मुंबई विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या बचावासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस मैदानात उतरले आहेत. महाविकास आघाडीच्या नेत्यांवर होणाऱ्या आरोपांवरून लक्ष विचलित करण्यासाठी वानखेडे यांना लक्ष्य केलं जात असल्याचा आरोप फडणवीसांनी केला आहे. फडणवीसांच्या या आरोपांना शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज सणसणीत प्रत्युत्तर दिलं. (Sanjay Raut Taunts Devendra Fadnavis)

समीर वानखेडे यांनी ड्रग्ज प्रकरणात आजवर अनेक बोगस कारवाया केल्या? त्यांनी बोगस कागदपत्रे बनवून नोकरी मिळवली व एनसीबीच्या आडून ते खंडणी वसुली करतात. आर्यन खानवरील कारवाई देखील बोगस आहे. बॉलिवूडमधील लोकांना अडकवून त्यांच्याकडून वसुली करण्यासाठी रचलेलं हे कुभांड आहे. त्यामागे भाजप आहे,’ असा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे. मलिक हे वानखेडे यांच्या विरोधात रोजच्या रोज नवनवे पुरावे देत आहेत. त्यामुळं खळबळ उडाली आहे. यात भाजपचंही नाव येत असल्यामुळं फडणवीस यांनी काल वानखेडे यांची बाजू घेत महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला होता. ‘एखादा अधिकारी तपास करतो म्हणून त्याची जात, धर्म काढणे आणि त्यावर आधारित आरोप करणं हे दुर्दैवी आहे,’ असं फडणवीस म्हणाले होते.

वाचा: फडणवीसांच्या योजनेला क्लीन चिट मिळताच भाजप आक्रमक; चित्रा वाघ म्हणाल्या…

त्यावर संजय राऊत यांनी आज प्रतिक्रिया दिली. ‘ज्या अधिकाऱ्यांची वकिली फडणवीस करताहेत, त्यांनी आतापर्यंत अनेक संशयास्पद प्रकार केले आहेत. रिया चक्रवर्तीलाही असंच अडकवण्यात आलं होतं. तिच्यावर अद्याप आरोपपत्र दाखल झालेलं नाही. ही सरळ सरळ खंडणीखोरी आहे, हे आता स्पष्ट झालंय. अशा खंडणीखोरांची वकिली फडणवीस करत आहेत. त्यांच्या सारख्या चांगल्या, सुसंस्कृत नेत्याचं अध:पतन बघवत नाही,’ असा खोचक टोला राऊत यांनी हाणला आहे. ते ‘टीव्ही ९’ या वृत्तवाहिनीशी बोलत होते.

महाराष्ट्राच्या बदनामीचा केंद्राचा कट

‘महाराष्ट्राला बदनाम करण्याचं षडयंत्र रचलं जातंय. त्यामागे केंद्र सरकारचा मोठा कट आणि डाव आहे, या आरोपाचा पुनरुच्चारही त्यांनी केला. ‘उद्योग जगत असेल, सिनेउद्योग असेल, पोलीस, मंत्रिमंडळ असेल, सर्वांची प्रतिमा मलिन करण्याचं काम सुरू आहे. भाजपचं राज्य आलं नाही, मुख्यमंत्री झाला नाही याचा राग ते काढताहेत. हे लोकशाहीला, घटनेला धरून नाही. महाराष्ट्र स्वाभिमानी आहे. महाराष्ट्राचा कणा ताठ आहे, महाराष्ट्र झुकणार नाही,’ असंही त्यांनी ठणकावलं.

वाचा: दीपिका, सारा, श्रद्धा कपूरला अटक का झाली नाही?; नवाब मलिकांना ‘ही’ शंकाSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: