Priyanka Gandhi: रेल्वे प्रवास करत बुंदेलखंडात पोहचल्या प्रियांका गांधी; हमालांशी, मृत शेतकऱ्याच्या कुटुंबाशी संवाद
हायलाइट्स:
- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२
- प्रियांका गांधी बुंदेलखंडातील ललितपूरमध्ये दाखल
- मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबाची घेतली भेट
प्रियांका गांधी लखनऊहून रेल्वेनं ललितपूरला पोहचल्या आहेत. यापूर्वी लखनऊच्या चारबाग रेल्वे स्टेशनवर त्यांनी हमालांच्या एका लहानशा गटाशी संवाद साधला तसंच त्यांची विचारपूसही केली.
यावेळी, हमालांनी प्रियांका गांधी यांना आपल्या दररोजच्या जीवनाशी निगडीत समस्याही सांगितल्या. लॉकडाऊनच्या वेळी रेल्वे स्टेशन बंद करण्यात आल्यानं आपल्यावर आणि कुटुंबीयांवर आर्थिक संकट कोसळल्याचं सांगत त्यांनी प्रियांका गांधी यांच्यासमोर आपलं मन मोकळं केलं. यावेळी, काँग्रेस सत्तेत आली तर हरएक संभाव्य मदत करण्याचं आश्वासन प्रियांका गांधी यांनी हमालांना दिलं.
प्रियांका गांधी रेल्वे मार्गानं ललितपूरला दाखल झाल्या आहेत. इथं त्यांनी मृत शेतकऱ्याच्या कुटुंबीयांची भेट घेतली. खतांसाठी लागलेल्या रांगेत उभं असताना या शेतकऱ्याचा हृदयविकाराच्या तीव्र धक्क्यानं मृत्यू झालाय. बुंदेलखंडात शेतकऱ्यांना खतांच्या टंचाईला सामोरं जावं लागतंय. खतं मिळवण्यासाठी दोन – दोन दिवस शेतकरी रांगेत उभे राहत आहेत. शेतकऱ्यांच्या या प्रश्नावर काँग्रेसनं लक्ष वेधलंय.
बुंदेलखंडानंतर प्रियांका गांधी मध्यप्रदेशातील दतियामध्ये पितांबरा मंदिरात दर्शनासाठी जाणार आहेत.
यापूर्वी एका शेतात जाऊन तिथं काम करणाऱ्या महिलांशी प्रियांका गांधी यांनी संवाद साधला होता. आता लखनऊच्या चारबाग रेल्वे स्टेशनवर त्यांनी हमालांच्या एका गटाची भेट घेत त्यांच्याशी संवाद साधला होता.

प्रियांका गांधी शेतात महिलांशी संवाद साधताना, बाराबांकी
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकारला घेरण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. लखीमपूर खीरीमध्ये आपल्या पिकांच्या विक्री न झाल्यानं एका शेतकऱ्यानं बाजारातच स्वत:ला पेटवून घेतल्याचं समोर आलं होतं. ही बातमी उचलून धरत प्रियांका गांधी यांनी २३ ऑक्टोबर रोजी सोशल मीडियाद्वारे सरकारवर निशाणा साधला होता. उत्तर प्रदेशातील भाजप सरकार शेतकऱ्यांचा छळ करण्याची एकही संधी सोडत नाही, अशी टीका त्यांनी केली होती.