‘काँग्रेसचे नेते दरोडेखोर नसतात, ते परवडले; पण राष्ट्रवादीचा भरवसा नाही’


हायलाइट्स:

  • चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यामुळं उंचावल्या भुवया
  • पाटील यांनी केलं काँग्रेस नेत्यांचं कौतुक
  • राष्ट्रवादी काँग्रेसवर मात्र साधला निशाणा

सूर्यकांत आसबे । सोलापूर

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीच्या आधी नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपनं ‘काँग्रेसमुक्त भारत’ अशी घोषणा दिली होती. पंतप्रधान मोदी यांच्या प्रत्येक भाषणात ‘काँग्रेसमुक्त भारत’ हा शब्दप्रयोग ऐकायला मिळायचा. ती भूमिका भाजपनं बदलली की काय, अशी शंका वाटण्यासारखं वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. (BJP Leader Chandrakant Patil Praises Congress Leaders)

सोलापुरात एका कार्यक्रमानिमित्त आलेल्या चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी चक्क काँग्रेस नेत्यांचं कौतुक केलं. ‘काँग्रेसचे नेते वेल कल्चरड आहेत. ते दरोडेखोर नसतात. पण राष्ट्रवादीवर भरवसा नाही’, असं चंद्रकांत पाटील म्हणाले. ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भरवशाचा नाही. त्यांचं सकाळी एक राजकारण असतं आणि रात्री दुसरंच राजकारण असतं. एक वेळ काँग्रेस परवडली. काँग्रेस नेते सुसंस्कृत आहेत. ते दरोडेखोर नसतात. त्यामुळे आम्ही राष्ट्रवादीच्या सलगीला भुलणार नाही, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

वाचा: होय! मी भंगारवाला आहे, पण…; नवाब मलिक यांचं भाजपला सडेतोड उत्तर

२०१४ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसनं भाजपला पाठिंबा देऊ केला होता. २०१९ मध्ये अजित पवार यांनी काही आमदारांना घेऊन देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत शपथही घेतली होती. मात्र, दीड दिवसांतच राजीनामा देत त्यांनी माघार घेतली होती. त्यानंतर भाजपला बाजूला ठेवून राज्यात शिवसेनेच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं. तेव्हापासून शिवसेनेबरोबरच भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या संबंधांमध्ये वितुष्ट आलं आहे. केंद्र सरकारच्या नियंत्रणाखाली असलेल्या केंद्रीय तपास यंत्रणांनी शिवसेनेबरोबरच राष्ट्रवादीच्या सर्वाधिक नेत्यांना लक्ष्य केलं आहे. काँग्रेसच्या बाबतीत मात्र भाजपनं सौम्य भूमिका घेतल्याचं दिसत आहे. भाजपचे नेतेही महाविकास आघाडी सरकारबद्दल बोलताना शिवसेना व राष्ट्रवादीवर टीका करताना दिसतात. आजही पाटील यांनी अपेक्षेप्रमाणे राष्ट्रवादीवर निशाणा साधला. मात्र, ते करताना त्यांनी काँग्रेसचं चक्क कौतुक केल्यानं सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.

वाचा: …म्हणून मी वानखेडेंच्या पहिल्या पत्नीचे फोटो ट्वीट केले; नवाब मलिक यांचा गौप्यस्फोटSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: