बुलडाण्यात स्टेट बँकेवर मोठा दरोडा, चोरट्यांनी आख्खी तिजोरी साफ केली!
हायलाइट्स:
- बुलडाणा जिल्ह्यात स्टेट बँकेवर मोठा दरोडा
- चिखली तालुक्यातील केळवद शाखेतील प्रकार
- चोरट्यांनी तिजोरीतील २० लाख केले लंपास
जिल्ह्याच्या चिखली तालुक्यातील केळवद (Kelwad) येथील स्टेट बँकेच्या (Robbery at State Bank) शाखेवर २० लाखाचा दरोडा पडल्याची खळबळजनक घटना आज सकाळी साडेनऊच्या वाजताच्या दरम्यान उघडकीस आली आहे. सकाळी बँकेचा शिपाई बँक उघडण्यासाठी आला आला असता ही बाब लक्षात आली. या घटनेची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आली.
घटनास्थळी वरिष्ट पोलीस अधिकारी व श्वान पथक दाखल झाले होते. रात्रीच्या दरम्यान खिडकीचे गज वाकवून चोरटे बँकेत शिरले. गॅस कटरच्या साहाय्याने तिजोरी फोडली आणि त्या तिजोरीतून २० लाख ८१ हजार ५७५ रुपये चोरी करून पळ काढला. सकाळी शिपाई बँकेत आला, तेव्हा खिडकीचे गज वाकवलेले गेल्याचे पाहून त्याला चोरीचा संशय आला आणि त्याने बँकेच्या अधिकाऱ्यांना ही माहिती दिली.
वाचा: हिंमत असेल तर नारायण राणेंनी…; विनायक राऊतांचं जाहीर आव्हान
स्टेट बँकेची शाखा केळवदमध्ये किन्होळा रोडवर आहे. अधिकाऱ्यांनी बँकेत येत पाहणी करून तातडीने पोलिसांना कळवले. त्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलीस उपविभागीय अधिकारी सचिन कदम, बुलडाणा स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक बळीराम गिते, चिखली पोलीस ठाण्याचे ठाणेदार अशोक लांडे हेही घटनास्थळी आले आहेत. श्वानपथकालाही पाचारण करण्यात आले. श्वानाने बँकेच्या बाजूच्या शेतापर्यंत माग काढला. तिथे दरोडेखोरांचे हँडग्लोज व बॅटरी मिळाली. सीसीटीव्हीत दरोडेखोर कैद झाल्याची शक्यता असून, सीसीटीव्हीचे फूटेज तपासले जात आहे.
वाचा: नवाब मलिक यांना अशीच पिढी घडवायची आहे; माजी खासदार भडकला