७६ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त बार असोशिएशनच्या विद्यमाने भीम प्रतिष्ठान च्यावतीने ॲड प्रविणसिंह रजपूत व ॲड संजीव सदाफुले यांचा विधी भूषण उपाधिने गौरवः
मानवी इतिहासात न्यायाचा विचार महावीर बुध्दांनी मांडला
संविधान हे दीनदुबळ्या शक्तिहीन व्यक्तिंच्या हातातील शस्त्र : डॉ.रावसाहेब पाटील

सोलापूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२२ जानेवारी २०२५ – परिश्रम, सातत्य आणि प्रामाणिक सेवेतून प्रतिकूल परिस्थितीतही यश संपादन करता येते.आजचे सत्कारमूर्ती ॲड संजीव सदाफुले आणि ॲड.प्रविणसिंह रजपूत हे आमच्या बार असोशिएनचे भूषण तर आहेतच पण सोलापूरच्या विधी व न्याय क्षेत्रातील आदर्श आहेत असे मत सोलापूर बार असोशिएशनचे अध्यक्ष ॲड अमित आळंगे यांनी व्यक्त केले.
७६व्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने सोलापूर बार असोशिएशन च्या विद्यमाने आणि भीम प्रतिष्ठानच्यावतीने बार असोशिएशनच्या सभागृहात सकाळी १०.३० वा.आयोजित समारंभात ते अध्यक्ष म्हणून बोलत होते.सोलापूर जिल्ह्याचे सरकारी वकील ॲड प्रविणसिंह रजपूत यांचा डॉ. रावसाहेब पाटील आणि ज्येष्ठ विधिज्ञ ॲड संजीव सदाफुले यांचा दत्ता गायकवाड यांच्या हस्ते विधी-भूषण उपाधी देऊन सन्मान व गौरव करण्यात आला.

सन्मानानंतर बोलताना ॲड प्रविणसिंह रजपूत यांनी सांगितले की,संस्था व व्यक्तिंनी निस्पृह वृत्तीने समाजकार्य केल्यास डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे आदर्श देशाचे स्वप्न साकार होईल. आपल्या ज्युनियर वकील मित्रांना कसे सहकार्य करावे, त्यांच्या मनात आत्मविश्वास कसा जागवावा याचे आदर्श उदाहरण म्हणून ॲड.संजीव सदाफुले हे आहेत.डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने प्रतिष्ठापित संस्थेच्यावतीने सन्मान वा गौरव स्वीकारतांना जबाबदारीचीही मला जाणीव असल्याचे सांगून त्यांनी भीम प्रतिष्ठानच्या कार्याचे कौतुक केले.
आपल्या मनोगतात ॲड संजीव सदाफुले यांनी आपल्या वकीली व्यवसायाच्या प्रारंभीच्या संघर्षाची वाटचालीची आठवण सांगत आपण वकीली व्यवसाय आणि राजकीय -सामाजिक विचार यांची गल्लत केली नसून ज्या त्या भूमिकेशी एकनिष्ठ असल्याचे सांगितले.आपल्या व्यक्तिमत्वावर डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवन व विचाराचा प्रभाव असून त्यांच्याच प्रेरणेतून सामाजिक चळवळीत सहभाग घेतला असल्याचे ॲड.सदाफुले यांनी सांगितले.

प्रमुख पाहुणे डॉ.रावसाहेब पाटील यांनी भीम प्रतिष्ठानची भूमिका सांगत असताना सत्यमेव जयते हे खरे आहे पण जे सत्य आहे ते न्याय आहे का ? न्यायाचा हा विचार जगामध्ये लाओ त्से तुंग, भगवान महावीर व बुध्द यांनी केला आणि संविधानामध्ये बाबासाहेबांनी त्याच न्यायाचा, बंधुत्वाचा, समतेचा विचार मांडला.भारतीय संविधान हे दीन दुबळ्या, शक्तीहीन व्यक्तिच्या हातातील शक्तीशाली शस्त्र असून कितीही मोठ्या बलाढ्य शक्तीविरुद्ध लढण्याचे सामर्थ्य त्या संविधानात असल्याचे सांगितले.संविधाना तील ही शक्ती सामान्य व्यक्तींच्या पाठीशी उभे करण्यासाठी ज्या व्यक्ति मदत करीत आहेत त्या व्यक्तींचा सन्मान करून त्यांचा आदर्श समाजातील नवतरुणांसमोर ठेवावे या हेतूने विधी-भूषण गौरव समारंभाचे आयोजन असल्याचे त्यांनी सांगितले.भीम प्रतिष्ठानचे हे २५ वे -रौप्य महोत्सवाचे वर्ष असून वर्षारंभीच हा संविधान जागृती अभियान कार्यक्रम सत्र आयोजित केला असल्याचे प्रतिपादन केले.

दत्ता गायकवाड यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान हे सामान्य लोकांच्या प्रतिष्ठा-आत्मभान आणि आत्मसन्माना साठी लिहिली असून देशाच्या स्वातंत्र्यासाठी जसे अधिकाधिक वकीलांनीच सहभाग घेतला जीवन प्रदान केले. त्याप्रमाणे देशाच्या संविधानाच्या रक्षणासाठी वकीलांनी उभे राहिले पाहिजे आणि बाबासाहेबांचे विचार पुढे घेऊन जाण्याचे कार्य केले पाहिजे असे सांगून संविधान जागृतीच्या या अभियान उपक्रमांचे त्यांनी स्वागत केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बार असोशिएशनचे सचिव ॲड मनोज पामूल यांनी केले. स्वागत भीम प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष बाबा बाबरे यांनी केले. आभार प्रदर्शन संस्थेचे उपाध्यक्ष ॲड विशाल मस्के यांनी केले.
या कार्यक्रमास भीम प्रतिष्ठानचे सेक्रेटरी अकबर शेख आणि बार असोशिएशनचे पदाधिकारी मंचावर उपस्थित होते. या कार्यक्रमात वकील बंधू-भगिनीची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली होती.