आश्वासन नव्हे,ठोस मदत हवी-पंचनामे नव्हे सरसकट भरपाई हवी – खासदार प्रणिती शिंदे
खासदार प्रणिती शिंदे यांची मंगळवेढा तालुक्यातील भालेवाडी,बोराळे,रहाटेवाडी, डोणज आणि माचणूर या अतिवृष्टीग्रस्त भागांना भेट देऊन शेतकऱ्यांना धीर दिला
मंगळवेढा/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०५ ऑक्टोबर २०२५ : सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी मंगळवेढा तालुक्यातील भालेवाडी, बोराळे, रहाटेवाडी, डोणज आणि माचणूर या अतिवृष्टी व पुरग्रस्त गावांना भेट देऊन झालेल्या नुकसानीची पाहणी केली. या दौऱ्यात त्यांनी शेतकरी बांधवांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि त्यांना धीर दिला.

अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांचे हातचे पीक वाहून गेले असून घरे,रस्ते व शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग हवालदिल झाला असून त्यांच्या उपजीविकेवर मोठे संकट ओढावले आहे.
या पार्श्वभूमीवर खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या की,या भीषण परिस्थितीत शासनाने फक्त पंचनाम्यांवर आणि घोषणांवर न थांबता तातडीने ठोस निर्णय घेतला पाहिजे. कोणत्याही अटी-शर्तींशिवाय शेतकऱ्यांच्या खात्यात थेट मदत जमा झाली पाहिजे.आश्वासनांनी पोट भरत नाही आता कृतीची वेळ आली आहे.शासनाने नुसत्या घोषणांवर न राहता सरसकट आणि भरीव आर्थिक भरपाई देऊन शेतकऱ्यांना आधार द्यावा अन्यथा या संकटात शेतकरी कोलमडून जातील.

खासदार प्रणिती शिंदे यांनी प्रशासनालाही सूचना दिल्या की,नुकसानग्रस्त भागातील राहिलेले पंचनामे तातडीने पूर्ण करून अहवाल शासनाकडे सादर करावेत, जेणेकरून मदतवाटपाची प्रक्रिया विलंब न होता तत्काळ सुरू होईल.
शेवटी खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या की, शेतकरी मायबाप आहे आणि त्यांच्या सोबत काँग्रेस पक्ष खंबीरपणे उभा आहे.प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत न्याय आणि मदत पोहोचवण्या साठी मी स्वतः प्रयत्नशील राहीन.

यावेळी काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रशांत साळे, प्रदेश सचिव रवीकिरण कोळेकर, जिल्हा उपाध्यक्ष अर्जुन पाटील, शहराध्यक्ष राहुल घुले,जिल्हा समन्वयक मनोज यलगुलवार, माजी सभापती संभाजी गावकरे, भालेवाडीचे सरपंच महादेव दवले, श्रीकांत गवळी, डोणजचे चेअरमन शशिकांत बुगडे, श्रीमंत केदार,संजय चौगुले,संजीव कवचाळे सर,सचिन नकाते,रहाटेवाडी सरपंच प्रदीप पवार,बजरंग पवार,माचणूरचे सरपंच कलुबर्मे,डोके सर,बबन सरवळे,अण्णासाहेब शिरसाट तसेच शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.