डॉक्टर व रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या संरक्षणासाठी कडक आरोग्य संरक्षण कायदा करण्यात यावा या मागणीसाठी खासदार प्रणितीताई शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली निवेदन

डॉक्टर आणि रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या संरक्षणासाठी कडक आरोग्य संरक्षण कायदा करण्यात यावा या मागणीसाठी खासदार प्रणितीताई शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर शहर डॉक्टर सेलचे निवेदन

सोलापूर शहर डॉक्टर सेलचे अध्यक्ष डॉ. अरमान पटेल यांची मागणी

सोलापूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१७ ऑगस्ट २०२४- कलकत्ता येथील आर.जी. कार या शासकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील महिला डॉक्टरची बलात्कार करून हत्या करणाऱ्या आरोपींना ताबडतोब फाशीची शिक्षा देण्यात यावी तसेच डॉक्टर आणि रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या संरक्षणासाठी कडक आरोग्य संरक्षण कायदा करण्यात यावा या मागणीसाठी खासदार प्रणितीताई शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर शहर डॉक्टर सेलचे अध्यक्ष डॉ. अरमान पटेल यांच्यासह शिष्टमंडळ डॉ विनायक वडते, डॉ.सोहेल अत्तार,डॉ.प्रवीण जाधव,डॉ.कुमार जोशी यांनी निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार यांना निवेदन दिले.

यावेळी बोलताना डॉ अरमान पटेल यांनी अशी मागणी केली की, पश्चिम बंगालमधील कलकत्ता येथील आर जी कार वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात कर्तव्यावर असलेल्या ३१ वर्षीय महिला पदव्यूत्तर प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर क्रूरपणे बलात्कार करून तिचा हत्या करण्यात आल्याची घटना उघडकीस झाल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. माणुसकीला काळिमा फासणाऱ्या, हृदय पिळवटून टाकणाऱ्या या घटनेमुळे केवळ वैद्यकीय क्षेत्रच नव्हे संपूर्ण देश हादरला आहे.आता या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आली आहे.मृत महिला डॉक्टरच्या पोस्टमॉर्टेम रिपोर्टनंतर एका आरोपीनेच नाही तर आणखी काही आरोपींनी महिला डॉक्टरवर अत्याचार केल्याचा दावा करण्यात आला आहे. मृत महिलेच्या कुटुंबियांनी देखील या घटनेत एकापेक्षा अनेक आरोपींचा सहभाग असल्याचा संशय व्यक्त केला आहे.यामुळे दिवसरात्र रुग्णांचे जीव वाचविण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या डॉक्टरांचे जीवन सुरक्षित नाही असे दिसून येत आहे.यासारख्या घटनांमुळे डॉक्टर,नर्सेस,रुग्णालयातील महिला कर्मचारी वर्गात भितीचे वातावरण पसरले असून डॉक्टर आणि रुग्णसेवा करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.या विरोधात देशभरातील लाखो ज्युनिअर डॉक्टर, रुग्णालय कर्मचारी, विद्यार्थी, राजकीय आणि सामाजिक संघटना आंदोलने करत आहेत.

आम्ही या माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घटनेचा तीव्र निषेध आणि वेदना व्यक्त करत असून बलात्कार करणाऱ्या आरोपींना ताबडतोब अटक करून फाशीची शिक्षा देण्यात यावी. जेणेकरून यापुढे असे अत्याचार करण्याची कोणाची हिम्मत होऊ नये.

तसेच भविष्यात अशा घटना होऊ नयेत यासाठी डॉक्टर, नर्सेस, रुग्णालयातील कर्मचाऱ्यांसाठी राज्य आणि केंद्र शासनाने कडक आरोग्य संरक्षण कायदा अंमलात आणावे, रूग्णालयातील ब्लाइंड स्पॉटवर सुरक्षा वाढवावी विशेषतः रुग्णालयातील डॉक्टर व महिला कर्मचाऱ्यांच्या सुरक्षतेत वाढ करावी तसेच इतर आवश्यक ती योग्य पाऊले उचलण्यात यावीत अशा मागण्या आम्ही आज निवेदनाद्वारे आपल्याकडे करत आहोत.आमच्या मागण्या शासनदरबारी पोहोचून पीडितेला न्याय मिळवून द्यावा व डॉक्टर आणि रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना संरक्षण मिळवून द्यावे.

Leave a Reply

Back To Top