सुराज्य स्थापनेचा संकल्प करून स्वातंत्र्य दिन साजरा करूया !

15 ऑगस्ट – स्वातंत्र्य दिनानिमित्त लेख

सुराज्य स्थापनेचा संकल्प करून स्वातंत्र्यदिन साजरा करूया ! Let’s celebrate Independence Day by resolving to establish Surajya!
   आपल्या स्वातंत्र्यसैनिकांनी असीम त्याग करून आणि आपल्या प्राणांचे  बलिदान देऊन इंग्रजांच्या 150 वर्षांच्या गुलामगिरीतून आपल्या देशाला सोडवले, यामुळेच आपण स्वातंत्र्यदिन साजरा करू शकत आहोत. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही 15 ऑगस्टला भारताचा स्वातंत्र्यदिन साजरा केला जाईल. आपल्याला स्वराज्य मिळाले मात्र सुराज्य स्थापन झाले नाही. जर आपल्याला आदर्श व्यवस्था हवी असेल, तर लोकांनी जागरूक होऊन आपले अधिकार जाणून संविधानिक मार्गाने संघर्ष करावा लागेल. सुराज्य स्थापनेचा आणि राष्ट्राचे रक्षण करण्याचा संकल्प करून स्वातंत्र्यदिन साजरा करूया !
  1. राष्ट्रप्रेम आणि एकजुटीचा अभाव यामुळे भोगावे लागलेले पारतंत्र्य – इंग्रजांच्या गुलामगिरीच्या जोखडातून आपल्या देशाची मुक्तता झाली, याची आठवण म्हणून दरवर्षी आपण स्वातंत्र्यदिन साजरा करतो. भारत स्वतंत्र होण्याआधी मुघल, पोर्तुगीज, आदिलशहा, कुतुबशहा व इंग्रज यांसारख्या अनेकांनी भारतावर राज्य केले. या सर्वांनी भारतातील स्वार्थी व फितुर यांना हाताशी धरून स्वातंत्र्यसैनिकांवर जुलूम करून राज्य केले. व्यापार करण्याच्या निमित्ताने इंग्रज भारतात आले. अशा मूठभर इंग्रजांनी लाखोंची संख्या असलेल्या आपल्या देशावर 150 वर्षे राज्य केले. आपल्यातील संघटन शक्तीच्या अभावामुळे इतक्या कमी संख्येने आलेले परकीय आपल्यावर राज्य करू शकले. आपल्यावर दुसरे कोणीतरी राज्य करत आहेत; ते जुलमी आहेत, हे लक्षात येऊनही केवळ राष्ट्रप्रेमाचा अभाव आणि एकजुटीचा अभाव यामुळे हे परकीय आपल्यावर राज्य करू शकले. योग्य त्या वेळी या गुणांचा वापर न झाल्याने आपल्याला पारतंत्र्यात रहावे लागले.
  2. स्वातंत्र्यपूर्व काळात राष्ट्रध्वजाला प्राणापलीकडे जपणारे देशभक्त – तिरंगा हा भारताचा राष्ट्रध्वज आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिशांचा ‘युनियन जॅक’ हा ध्वज भारतावर फडकत होता. ब्रिटिशांच्या जुलमी सत्तेच्या विरोधात जे जे उठाव, लढे, सत्याग्रह झाले, त्या त्या वेळी भारताचा तिरंगी ध्वज हातात धरून अनेक स्वातंत्र्यसैनिकांनी प्राणपणाने लढा दिला. अनेक जणांनी हा ध्वज छातीशी कवटाळून मरण पत्करले; पण ध्वज जमिनीवर पडू दिला नाही किंवा मरण येईपर्यंत हातातून निसटू दिला नाही, हा इतिहास आहे. ब्रिटिशांच्या काळात तिरंगा हाती घेणे, हा गुन्हा ग्राह्य धरला जात असे. अशाही परिस्थितीत हा ध्वज राष्ट्रभावना चेतवायचा. ध्वज आठवला की राष्ट्राबद्दल आपले कर्तव्य आठवायचे.राष्ट्रप्रेमी नागरिकांच्या शरीरातील पेशी अन पेशी ‘वंदे मातरम्’ हा त्या काळचा राष्ट्रीय महामंत्र म्हणू लागायची.
  3. भारतीयांनो, राष्ट्रध्वजाबाबतची जाणीव विकसित करा !

भारतीयांनो, राष्ट्रध्वज व राष्ट्राची अन्य प्रतीके यांच्याकडे संकुचित वृत्तीने न पहाता त्याबाबतची जाणीव विकसित करा. राष्ट्रध्वज हा राष्ट्रीय अस्मितेचे प्रतीक आहे, त्याचा योग्य तो मान राखणे, हे राष्ट्राभिमानाचे लक्षण आहे. त्याग, क्रांती, शांती व समृद्धी या मूल्यांची शिकवण राष्ट्रध्वज आपल्याला देतो. उत्साहापोटी राष्ट्रध्वजाचा अतिवापर, गैरवापर करतांना आपण ही मूल्येच पायदळी तुडवत आहोत हेही लक्षात असू द्या. राष्ट्रध्वजाचा होणारा अवमान रोखणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. स्वातंत्र्यासाठी लढलेल्या स्वातंत्र्यवीरांची व क्रांतिकारकांची आठवण ठेवून त्यांच्यातील ज्या गुणांमुळे त्यांनी स्वातंत्र्याचा लढा दिला, ते गुण आपल्यात आणून त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करूया.

  1. राष्ट्रध्वजाचा अवमान रोखा ! –

स्वातंत्र्यदिनी आणि प्रजासत्तकदिनी ध्वजा रोहणाच्या वेळी ‘झंडा उँचा रहे हमारा’, असे अभिमानाने म्हटले जाते; पण त्याच वेळी लहान मुलांच्या हट्टापोटी खेळण्यासाठी घेतलेले किंवा वाहनांवर लावण्यासाठी घेतलेले कागदी आणि प्लास्टिकचे झेंडे रस्त्यावर अन् नंतर कचराकुंडीत पहायला मिळतात, तसेच ते पायदळी तुडवले जातात. काही जण तिरंग्याच्या रंगाप्रमाणे चेहरा रंगवतात. यामुळे स्वातंत्र्यदिनीच राष्ट्रध्वजाचा घोर अवमान होत आहे, याची जाणीवही आपल्याला होत नाही. क्रांतिकारकांनी जो ध्वज भूमीवर पडू नये,यासाठी लाठ्या खाल्ल्या,वेळप्रसंगी प्राणाचेही बलिदान दिले, त्यांच्या बलिदानाची ही क्रूर चेष्टाच नव्हे का ?

यंदाही दुकानातून, तसेच ‘ऑनलाईन’ पद्धतीने तिरंग्याच्या रंगातील ‘मास्क’ची विक्री होत असल्याचे आढळून आले आहे. तिरंग्याचा मास्क वापरल्याने राष्ट्रध्वजाचे पावित्र्य राखले जात नाही. ‘तिरंगा मास्क’ हे देशप्रेम प्रदर्शनाचे माध्यम नाही. अशोकचक्रासह तिरंग्याचा मास्क बनवणे आणि वापरणे, हा ध्वजसंहितेनुसार राष्ट्रध्वजाचा अवमानच आहे.असे करणे हे ‘राष्ट्रीय मानचिन्हांचा गैरवापर रोखणे कायदा 1950’, कलम 2 व 5 नुसार; तसेच ‘राष्ट्र प्रतिष्ठा अवमान प्रतिबंध अधिनियम 1971’चे कलम 2 नुसार आणि ‘बोधचिन्ह व नाव (अनुचित वापरास प्रतिबंध) अधिनियम 1950’ या तिन्ही कायद्यांनुसार दंडनीय अपराध आहे. राष्ट्रध्वजाचा मान राखणे, ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे, हे ओळखून जे विक्रेते शासनाचा अध्यादेश डावलून प्लास्टिकचे ध्वज विक्री करतात, ज्या व्यक्ती, संस्था, तसेच समूह राष्ट्रध्वजाचा अवमान करतात, त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करावी या साठी जागरूक नागरिकांनी पोलीस प्रशासनाकडे तक्रारी करून आपले राष्ट्रकर्तव्य निभावावे. पोलीस प्रशासनानेही सजग राहून राष्ट्रध्वजाचा अवमान करणाऱ्यांवर कठोर कारवाई करायला हवी.

  1. राष्ट्रीय सणांच्या दिवशी स्वातंत्र्यवीरांनी राष्ट्रासाठी केलेल्या प्रयत्नांची आठवण ठेवून त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करूया –

15 ऑगस्ट या दिवशी सकाळी ध्वजवंदन करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत.याउलट यादिवशी फिरायला जाणे,उशिरापर्यंत झोपणे, घरात दूरदर्शनचे कार्यक्रम पहात बसणे अश्या कृती होताना दिसतात.त्याऐवजी स्वातंत्र्यासाठी लढलेल्या स्वातंत्र्यवीरांची व क्रांतिकारकांची आठवण ठेवून त्यांच्यातील ज्या गुणांमुळे त्यांनी स्वातंत्र्याचा लढा दिला त्यांच्या प्रति कृतज्ञता म्हणून ध्वजवंदन करणे अधिक संयुक्तिक ठरते.

सध्याच्या ‘मेकॉले’च्या शिक्षणप्रणालीमुळे नागरिक केवळ सुशिक्षित होत आहेत पण सुसंस्कारी होत नाहीत. त्यामुळे उच्च शिक्षण घेऊन भारतीय प्रशासकीय सेवा (IAS), भारतीय पोलीस सेवा (IPS), डॉक्टर, अधिवक्ता आदी क्षेत्रात मोठे झालेले लोक सामान्य लोकांना लुटून भ्रष्टाचार करताना दिसतात. आपल्यात नैतिक मूल्य संवर्धन आवश्यक आहे. यासाठी प्रयत्न करणे तितकेच महत्वाचे आहे. आजपासून आपण आपल्या देशाचे उत्तम नागरिक होण्यासाठी प्रयत्न करायला हवेत.राष्ट्राभिमान व राष्ट्रभक्ती जागृत करण्यासाठी आणि संपूर्ण जगामध्ये आपल्या राष्ट्राचे नाव उज्ज्वल करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत.

  1. सामाजिक दुष्प्रवृत्तींच्या विरोधात व्यापक लढा उभारणे आवश्यक – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटले होते की, संविधान कितीही चांगले असले तरी, त्यावर अंमल करणारे शासनकर्तेच असक्षम असतील तर लोकशाही अपयशी ठरते. त्यानुसार आज संसदेत अनेक भ्रष्ट आणि गुन्हेगार सदस्य असल्याने लोकशाही फोल ठरल्याचे 74 वर्षांतच समोर येत आहे.लोकशाहीतील व्यवस्था पालटण्या साठी समाजाने निद्रिस्त न रहाता लोकशाहीने उपलब्ध करून दिलेल्या मार्गांचा उपयोग करणे आवश्यक आहे. निदर्शने, जनहित याचिका, माहिती अधिकाराचा वापर, तक्रार-निवेदन आदी न्याय्य मार्गांचा अवलंब करून लोकशाहीतील सामाजिक दुष्प्रवृत्तींच्या विरोधात व्यापक लढा उभारणे अपेक्षित आहे. हा लढाच आदर्श व्यवस्थेच्या दिशेने वाटचाल करेल.

संकलक : श्री.राजन बुणगे,हिंदु जनजागृती समिती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: