नाशिकला पुराचा धोका; गोदाकाठच्या रहिवाशांना सुरक्षित स्थळी जाण्याचे आवाहन


हायलाइट्स:

  • नाशिकमध्ये धरणांमधून पाण्याचा विसर्ग वाढला
  • गंगापूर धरणातून १५ हजार क्युसेक्सने पाणी सोडले जाणार
  • गोदाकाठच्या नागरिकांना स्थलांतरित होण्याचं आवाहन

नाशिक: जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असल्याने धरणांमधून पाण्याचा विसर्ग टप्प्याटप्प्याने वाढविण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. गंगापूर धरणातून दुपारी १२ नंतर १५ हजार क्युसेकने विसर्ग करण्यात येणार असल्याने गोदावरी नदीला पूर येणार आहे. नदी लगतच्या रहिवाशांनी सुरक्षित स्थळी स्थलांतरीत व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी केले आहे.

वाचा:डाव्या चळवळीतील विद्यार्थी नेते काँग्रेसमध्ये का जाताहेत?

जिल्ह्यात पुन्हा मंगळवार (दि. २८) पासून पावसाचा जोर वाढल्याने विसर्ग वाढविण्यात आला. विशेषतः गंगापूर, पालखेड धरणांच्या पाणलोट क्षेत्रात रात्रीपासून देखील संततधार पाऊस सुरूच असल्याने धरणे ओव्हर फ्लो झाली आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने विसर्ग वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. गंगापूर धरणातून मंगळवारी रात्री साडे तीन हजार क्यूसेकने विसर्ग सुरू होता. तो आज सकाळी नऊ वाजता दुपटीने वाढवून ७ हजार क्यूसेक करण्यात आला आहे. सकाळी १० वाजता हा विसर्ग १० हजार क्यूसेक करण्यात येणार असून दुपारी १२ नंतर १५ हजार क्यूसेक केला जाणार आहे. त्यामुळे नदीच्या पाण्याच्या प्रवाहात भरीव वाढ होणार असून पूर परिस्थिती निर्माण होणार आहे. त्यामुळे नदी काठालगत राहणाऱ्या नागरिकांनी सुरक्षित स्थळी स्थलांतरित व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी केले आहे.

आज गंगापूर धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग होणार असून तो १५००० क्युसेक्स पेक्षा अधिक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीच्या पाण्यात भरीव वाढ होणार असल्याने सर्व संबंधित विभागानी योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत. नदी लगतच्या नागरिकांनी सुरक्षित स्थळी स्थलांतरित व्हावे. अन्य नागरिकांनी नदीजवळ पूर पाहण्यासाठी गर्दी करू नये. आजही अतिवृष्टीचा इशारा विचारात घेता नागरिकांनी विनाकारण बाहेर पडू नये.

सूरज मांढरे, जिल्हाधिकारी. नाशिक

”पालखेड जलाशयाच्या लाभक्षेत्रात पावसाचे प्रमाण वाढत असल्यामुळे पालखेड धरणातून साेडण्यात येणारा विसर्ग वेळाेवेळी वाढत आहे. तरी कादवा नदिकाठचे राैळस व पिंप्री या दाेन गावांना जाेडणाऱ्या पुलावरून पाणी जाण्याची शक्यता आहे. काेणीही या पुलावरुन ये – जा करू नये” – उपविभागीय अधिकारी, पालखेड पाटबंधारे उपविभाग (पिंपळगांव बसवंत)Source link

Leave a Reply

Your email address will not be published.