अंबाबाई मंदिरात बॉम्ब ठेवल्याचा फोन: अफवा पसरवणारा ‘जावई’ अटकेत


हायलाइट्स:

  • अंबाबाई मंदिरात बॉम्ब ठेवल्याची अफवा
  • आरोपीला पोलिसांनी केली अटक
  • दारूच्या नशेत आरोपीने केलं होतं कृत्य

कोल्हापूर : करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात बॉम्ब ठेवल्याची अफवा एका दारूड्या जावईबापूने पसरवल्याचं उघडकीस आलं आहे. दारूच्या नशेत त्याने गुरुवारी दुपारी हा प्रताप केला. त्यामुळे दोन तास पोलीस यंत्रेणेसह सर्वांचीच तारांबळ उडाली. या प्रकरणी पोलिसांनी सुरेश लोंढे या जावयासह सासरे बाळासाहेब कुरणे यांना ताब्यात घेतलं आहे.

साडेतीन शक्तीपीठापैकी एक असलेल्या करवीरनिवासिनी अंबाबाई मंदिरात शारदीय नवरात्रोत्सवास काल गुरुवारी प्रारंभ झाला. टाळेबंदीमुळे बंद असलेल्या मंदिराचे दरवाजे भाविकांसाठी पहाटेपासून खुले झाले. मात्र दुपारच्या सुमारास अंबाबाई मंदिरात बॉम्ब ठेवल्याची अफवा पसरली आणि शहरात एकच खळबळ उडाली. दीड तासाच्या तपासानंतर असा कोणताही प्रकार नसल्याचे स्पष्ट झाले.

राणे म्हणाले, ‘मुख्यमंत्र्यांनी पाहुण्यासारखं सिंधुदुर्गात यावं, पाहुणचार करू, पण…’

अंबाबाई मंदिरात बॉम्ब ठेवल्याचा निनावी फोन दुपारी पणजीतून आला होता. हा फोन कोल्हापूर पोलीस कंट्रोल रूम येथे आला, त्यानंतर पोलिसांची तातडीने धावपळ सुरू झाली. मोठा पोलीस फौजफाटा अंबाबाई मंदिरात दाखल झाला. ज्या गाभाऱ्यात अंबाबाईची पूजा होते, तेथेच बॉम्ब सदृश्य वस्तू ठेवल्याचा तो फोन होता. त्यामुळे मंदिराच्या गाभार्‍यात कसून तपासणी करण्यात आली. सर्व पुजाऱ्यांची तपासणी पोलिसांनी केली आणि मंदिराचा कोपरा न् कोपरा पिंजून काढला. तासभर दर्शनही बंद करण्यात आले. दोन तास पोलिसांची मोठी धावपळ उडाली.

याबाबत पोलिसांनी तपासासाठी काही पथके नियुक्त केली. पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी विविध अधिकाऱ्यांना तातडीने याचा तपास करण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार फोनबाबत चौकशी केली. तेव्हा हा फोन पेठवडगाव येथून केल्याचे समोर आले. फोन ज्याच्या नावाने आहे, त्या बाळासाहेब कुरणे यास ताब्यात घेण्यात आले. हा फोन त्याच्या नावावर असला तरी तो त्याचा जावई सुरेश लोंढे वापरत असल्याची माहिती पुढे आली. त्यानुसार वाळवा तालुक्यातील बागणी येथून त्यालाही ताब्यात घेण्यात आले.

दारूच्या नशेत आपण हे कृत्य केल्याची कबुली त्याने दिली आहे. दारूड्या जावयामुळे आता सासराही अडचणीत आला आहे. जावयाच्या एका फोनमुळे दोन तास कोल्हापूर पोलिसांची धावपळ उडाली. कोल्हापुरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे यापुढे कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून बंदोबस्त वाढवण्यात आला होता.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: