पत्नीचे अनैतिक संबंध असल्याचा संशय; ४ साथीदारांना घेऊन रचला हत्येचा कट, पण…
हायलाइट्स:
- पाच संशयितांना पोलिसांनी केली अटक
- एक आरोपी तडीपार तर तीन रेकॉर्डवरील गुन्हेगार
- अनैतिक संबंधांच्या संशयावरून करणार होते खून
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी काही संशयित रात्रीच्या सुमारास आयटीआय पुलाच्या जवळ एका व्यक्तीच्या खुनाचा कट रचत असल्याची गोपनीय माहिती अंबड पोलीस ठाण्याचे गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश शिंदे यांना मिळाली. यावरुन वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने सापळा रचला. संशयितांना पोलीस आल्याची चाहूल लागताच त्यांनी त्या ठिकाणाहून पळ काढण्याचा प्रयत्न केला, मात्र दबा धरून असलेल्या पोलीस पथकाने संशयितांचा पाठलाग करत त्यांना अटक केली.
आरोपींमध्ये निखिल उर्फ (निकु) अनिल बेग (२३, रा. द्वारका), विशाल संजय अडांगळे (२४, लेखानगर,) साहिल उर्फ (सनी) शरद गायकवाड (२३, रा. पंचवटी), ज्ञानेश्वर उर्फ (निलेश) कारभारी लोहकरे (२५, रानाप्रताप चौक), रोशन संजय सूर्यवंशी (१९ रानाप्रताप चौक, सिडको) यांचा समावेश आहे. या आरोपींची अंगझडती घेतली असता एक गावठी कट्टा तसेच दोन जिवंत काडतुसे, तीन कोयते हस्तगत करण्यात आले. यानंतर कसून चौकशी केली असता यांच्यातील एका जणाच्या पत्नीचे दुसऱ्या व्यक्तीसोबत अनैतिक संबंध असल्याने सदर व्यक्तीला जीवे मारण्याकरिता त्यांनी कट रचला असल्याची कबुली दिली.
दरम्यान, ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुमार चौधरी, पोलीस निरीक्षक नंदन बगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली, गुन्हे शोध पथकाचे सपोनि गणेश शिंदे, पोलीस नाईक किरण गायकवाड, हेमंत आहेर, राकेश राऊत, अनिरुद्ध येवले, नितीन सानप,मुकेश गांगुर्डे, मुरली जाधव, योगेश शिरसाट यांनी केली.